दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत डाळिंब उत्पादना साठी संतुलितअन्नद्रव्यांचा वापर आवश्यक -डॉ. कौसडीकर

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा (सोलापूर) व गुरुकृपा ॲग्री मार्ट, गौडवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गौडवाडी, तालुका सांगोला येथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची शेतीशाळा व किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालकमा. डॉ. श्री. हरिहर कौसडीकर यांनी जमिनीचे आरोग्य व संतुलित पोषण याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी ते म्हणाले की मानवप्राणी ,सूक्ष्मजीव ,जनावरे याप्रमाणेच जमीन ही सुध्दा सजीव घटक असून तिचा जिवंतपणा टिकवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे .बदलत्या शेती पद्धतीचे मूळ हे जमीनच असून प्रत्येक झाडाची शरीरक्रिया व्यवस्थित टिकविण्यासाठी तिचे संतुलित पोषण झाले तरच कोणतेही फळझाड रोग व किड प्रतिकारक्षम बनते .
डाळींब पिकांच्या उत्पादन वाढीत कोणत्याही एका अन्नद्रव्याचा अतिरेकी वापर हा झाडासाठी व मातीसाठी हानिकारक असून प्रत्येक अन्नद्रव्याचे सर्वसमावेशक वापर होणे आवश्यक आहे . त्यासाठी शेतकऱ्यांनी विविध अन्नद्रव्याचे कार्य समजून घेतले पाहिजे.
सेंद्रिय खते ही जमीन व पर्यावरण पूरक असून मातीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी हिरवळीची खते, विविध पेंडी, निंबोळी पेंड ,करंज पेंड ,गांडूळ खत,कंपोस्ट खत व आच्छादन यांचा वापर शेतकऱ्यांनी वाढवावा.
तसेच रासायनिक खतासमवेत सेंद्रिय खते आणि जैविक खते डाळींब पिकाला दिली गेली पाहिजेत.
शेतकऱ्यांनी युरिया सारख्या रासायनिक खताचा किमान वापर करून अमोनियम सल्फेट या खताचा पर्यायी वापर करावा. डाळिंबाचे बहार व फळधारणेच्या अवस्थेनुसार खताचे नियोजन कसे करावे हे श्री. कौसडीकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
बोर्डो मिश्रण हे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक असून बहार धरतेवेळी छाटणीच्या अगोदर व छाटणी नंतर याचा वापर होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
हमखास ,शाश्वत, दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण डाळिंब उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे असून तिच्याकडे सर्वांनी लक्ष देण्याचे मार्गदर्शन कौसडीकर यांनी उपस्थित शेतक-यांना केले.
या कार्यक्रमास श्री. प्रभाकर चांदणे अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ, डॉ.प्रकाश कुलकर्णी तांत्रिक सल्लागार डाळिंब महासंघ, डॉ.विनायक काशीद सदस्य कार्यकारी परिषद बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, श्री. मदन मुकणे प्रकल्प संचालक आत्मा (सोलापूर) , श्री. बाळासाहेब लांडगे उपविभागीय कृषी अधिकारी, पंढरपूर श्री. शिवाजीराव शिंदे तालुका कृषी अधिकारी सांगोला, श्रीमती भाग्यश्री पाटील मंडळ कृषी अधिकारी जुनोनी, अॅड. सचिन देशमुख , उद्यान पंडित प्रगतशील शेतकरी मार्गदर्शक श्री. राहुल रसाळ आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये तालुका कृषी अधिकारी श्री .शिवाजी शिंदे यांनी सांगोला तालुक्यातील डाळिंबाची सद्यपरिस्थिती व फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून डाळिंबाचे तालुक्यातील क्षेत्र वाढी संदर्भात कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
त्यानंतर डॉ.प्रकाश कुलकर्णी यांनी डाळिंब निर्यातीच्या संधी व उज्वल भविष्य याविषयी मार्गदर्शन केले तर अहमदनगरचे प्रगतशील शेतकरी मार्गदर्शक उद्यान पंडित श्री .राहुल रसाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना स्लरी महत्त्व, निर्मिती व तिचा वापर याविषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी सांगोला, जत, आटपाडी, म्हसवड, कवठे महांकाळ, मंगळवेढा, माढा, पंढरपूर, माळशिरस इ. तालुक्यातील तसेच सांगली व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी गौडवाडीचे कृषी सहाय्यक श्री .मयूर माळी, तसेच श्री. आर.डी.चव्हाण, श्री. समाधान गवळी, श्री. विक्रम वाघमारे, सौ.बनसोडे मॅडम , श्री. गौरव गावडे, श्री. सतीश चव्हाण, श्री. राजू टेंगले, कृषी पर्यवेक्षक श्री. विकास भाले, श्री. प्रविण जाधव, आत्माचे श्री. मेघराज पोळ, श्री. सोनवणे त्याच बरोबर गौडवाडी येथील गुरूकृपा अॕग्री मार्ट शेतकरी गटाचे सदस्य प्रगतशील डाळिंब बागायतदार रिसोर्स फार्मर श्री. नाना माळी, श्री आण्णा गडदे, श्री. कलाप्पा गडदे , श्री. शिवाजी हिप्परकर कृषी मित्र हणमंत गडदे व श्री.रामचंद्र करांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक श्री. श्रीधर शेजवळ यांनी केले; तर श्री. सतीश देठे (कृषी पर्यवेक्षक) यांनीउपस्थितांचे आभार मानले.