बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात

नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात गुरुवार दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजता प्रभात फेरी व विणापूजनाने करण्यात आली.२० ऑक्टोंबर रोजी बाळकृष्ण माऊली चरित्राचे उद्घाटन करण्यात आले. दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी ज्योत आणण्यासाठी माऊली भक्तगण इंचगिरी येथे प्रयाण झाले.दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी ठिक चार वाजता नंदेश्वर नगरीतून श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या पालखी व रथाची भव्य-दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीमध्ये नाचणारा घोडा,बेंगलोर येथील चंदे वादक पथक,मळेगाव येथील लेझीम पथक,ढोल,टाळकरी,विणेकरी, झेंडेकरी अश्या अचुक पद्धतीने माऊलींच्या पालखी व रथाची मिरवणूक नंदेश्वर नगरीतून काढण्यात आली.
दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठिक सात वाजता पूजा करण्यात आली,नऊ वाजता मुंबईतील सद्गुरु महिला भजनी मंडळ व श्रीराम भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला व ठिक अकरा वाजता बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन झाले व दुपारी ठिक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
या सप्ताह सोहळ्यासाठी मुंबई,कर्नाटक व कोकण विभागातून मोठ्या प्रमाणात महाराज मंडळी,संतजन,गुरु बंधू-भगिनी नंदेश्वर येथे दाखल झाले होते.