मराठा आरक्षण: सांगोला तालुक्यात सरकारच्या विरोधात युवकांनी केले मुंडण; सांगोल्यात बससेवा ठप्प; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

सांगोला(प्रतिनिधी):-सरकार आरक्षण मागणी मान्य करु शकले नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण सुरु करावे लागले. आज पुन्हा सहा दिवस झाले तरी सरकार निर्णय घेऊ शकले नाही त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मंगळवारी सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे व कडलास गावातील तरुणांनी आक्रोश करत मुंडण करत सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडण करुन मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा दिला. सांगोला तालुक्यात सर्वच ठिकाणी शांततेच्या मार्गाने सकल मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको, गाव बंद, मुंडण, मशाल मोर्चा, अशा विविध आंदोलनाव्दारे सरकारचा निषेध करण्यात येत आहे.
मंगळवार दि.31 ऑक्टोबर रोजी सांगोला येथे चूल बंद आंदोलन करुन सरकारचा अनोख्या पध्दतीने निषेध करण्यात आला.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जाळपोळ , तोडफोडीच्या घटना होत असल्याने खबरदारी म्हणून एसटी च्या सांगोला आगाराने बहुतांश फेर्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. आगारातील लांब पल्ल्याच्या बस मंगळवारी बंद होत्या. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बसअभावी हाल झाले. याशिवाय दिवाळी खरेदीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
सांगोला तालुक्यात कडलास येथे मराठा आरक्षणासाठी दिपक पवार यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषण स्थळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडण करुन या लढ्याला पाठिंबा दिला.यावेळी कडलासमधील 9 जनांनी मुंडण करुन आरक्षण मागणीस पाठिंबा दिला.
वासुद ता.अकोला येथे मशाल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजकीय व्यक्तीच्या छायाचित्रांच्या दहा तोंडी रावणाचे प्रतिकृतीचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे सायंकाळच्या सुमारास अकोला, वाढेगाव, बलवडी, डोंगर पाचेगाव मोर्चा काढण्यात आला होता.
पाचेगाव येथे पोपट घुले महाराज व आबासाहेब चव्हाण पाटील ज्ञानेश्वरी पारायण वाचून उपोषण सुरु आहे. त्याचप्रमाणे वाकी घेरडी, वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव आदी गावे 100 टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.
धायटी येथे टायर पेटवून रस्ता रोखत रास्ता रोको करण्यात आला. तसेच मेथवडे येथे रास्ता रोको संपन्न झाला. यावेळी रास्ता रोको प्रसंगी टायर जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी धायटी व मेथवडे येथील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वाकी शिवणे येथे युवकांनी मुंडन करून रास्ता रोको आंदोलन केले. त्याचप्रमाणे येणार्या कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे धायटी व बलवडी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कुठल्याही राजकीय व्यक्तींना गावात येऊ न देण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे.
आज बुधवार दि.1 नोव्हेंबर रोजी मशाल मोर्चा, उद्या गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको, शुक्रवार दि.3 नोव्हेंबर रोजी महामोर्चा तर शनिवार दि.4 नोव्हेंबर रोजी सांगोला तालुका बंद ठेण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आली.
————————————————-
मराठा आरक्षण मागणीसाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले मुंडण
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडण करुन मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा दिला यावेळी समाजबांधवांची दिवसेंदिवस ढासळत चालेली परिस्थिती आता बघणे अशक्य असून आपण यावरती त्वरित व तात्काळ उपाययोजना, कायदे कलम करून कायद्याच्या कचाट्यात सापडलेला हा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याकरिता विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे तसेच प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून कायद्यात टिकणारे कायमस्वरूपाचे आरक्षण बहाल करावे अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली.



