डाळिंब लागवड हिवाळ्यात करावी:-डॉ. बाबासाहेब गोरे

सांगोला(प्रतिनिधी):-डाळिंब लागवड पावसाळ्यात न करता हिवाळ्यात केल्यास डाळिंब उत्पादनात नक्कीच भर पडेल. त्याचप्रमाणे डाळिंबामध्ये तेलकट डागाची मोठी समस्या आहे. त्यावर अद्याप कोणत्याच प्रकारचे शंभर टक्के खात्रीशीर औषध उपलब्ध नाही. तरीदेखील शेतकरी बाजारातील महागडी औषधे खरेदी करून फवारणी करतात पण डाळिंबाच्या तेलकटतेवर परिणाम होत नाही . यासाठी शेतकर्यांनी सशक्त डाळिंब रोपे लागवड करताना रोपवाटिका तेलकट डाग रोगमुक्त असल्याची खात्री करूनच डाळिंबाची लागवड करावी असा सल्ला डाळिंबरत्न बी. टी. गोरे सर यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री बाबुरावजी गायकवाड यांनी भूषवले तर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, दिपाली जाधव, सी .बी. जांगळे व शिल्पा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गोरे सर यांनी ’ रोग ’ ही संकल्पना समजावून सांगून रासायनिक व विद्राव्य खतांचा योग्य वापर, योग्य फवारण्या, फवारणीचे वेळापत्रक ,रोग नियंत्रणासाठी अजैविक व जैविक घटक ,डाळिंबाचे गुणवत्ता व उत्पादन घटण्याची कारणे तसेच जमिनीच्या सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी गांडूळ खत व व्हर्मी वाशच्या वापरासह इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून जमिनीच्या सुपिकते कडे लक्ष द्यावे असा सल्ला गोरे सर यांनी दिला. रासायनिक व विद्राव्य खतांचा अतिरेकी वापर टाळून, रोग येण्याची अवस्था व हवामान यांचा बारकाईने अभ्यास करून फवारणी करावी, यामुळे बराचसा खर्च वाचेल असे गोरे सर म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन यशराज गांडूळ खत प्रकल्प वाटंबरेचे उद्योजक सुरेश पवार आणि विजय कृषी सेवा केंद्र शाखा नाझरा ,कोळा , बनपुरी आणि अशपाक काझी सर यांनी केले.
प्रास्ताविक अशपाक काझी सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मिलिंद पवार सर आणि आभार सतीश पाटील यांनी केले.