महूद येथील मुख्य चौकात वाहतूक कोंडी; पोलीस यंत्रणेची केवळ बघ्याची भूमिका

महूद, ता. १७ : सांगोला तालुक्यातील महूद येथील मुख्य चौकात सातत्याने झालेली गर्दी, अडकलेली चार चाकी वाहने, रस्त्यात लावलेल्या मोटार सायकली, गैरहजर पोलीस कर्मचारी अन् सततचा वाजणारा सायरन ही बाब नित्याचीच झाली आहे. याबाबत पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने हे नित्याचे चित्र झाले आहे.यामुळे महूदकर कमालीचे हैराण झाले आहेत.
जत-मुंबई व सोलापूर-चिपळूण या मार्गावरील महूद हे चौकाच्या ठिकाणचे गाव आहे.जत ते मुंबई व सोलापूर ते चिपळूण या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही महूद मार्गे पुढे जातात.या दोन्ही मार्गावरील जड वाहतूक,प्रवाशी वाहतूक,मालाची वाहतूक ही महूद मार्गे होत आहे.यामुळे मालवाहतुकीचे मोठे ट्रक,कंटेनर,एसटी बसेस,खाजगी प्रवासी वाहतूक बसेस, चार चाकी वाहने,दुचाकी वाहने,खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांची प्रचंड मोठी वर्दळ येथील मुख्य चौकात अहोरात्र सुरू असते.पंढरपूर -दिघंची मार्गाचे काम झाले असले तरी येथील मुख्य चौकात हा रस्ता अपुरा पडतो आहे.
मुख्य चौकातील दुकानदार, व्यावसायिक यांच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने उभी असतात.त्यातच दुकानाच्या समोर व रस्त्याच्या कडेला फळ विक्रेते,विविध प्रकारचे व्यावसायिक यांनी आपला व्यवसाय थाटलेला आहे.त्यांच्याही पुढे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम,जीप,बस,मालवाहतूक करणारी वाहने उभी असतात.अगोदरच रुंदीला अपुरा असणारा रस्ता व या सगळ्या प्रकारच्या अडथळ्यामुळे चौकातून होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. गौरी गणपती,दिवाळी, रक्षाबंधन अशा विविध सणावारांच्या निमित्ताने असंख्य विक्रेते आपला व्यवसाय रस्त्याला चिटकूनच थाटतात.यामुळे सणावाराच्या वेळी वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. येथील मुख्य चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आत्तापर्यंत असंख्य जणांचे बळी मुख्य चौकाच्या ठिकाणी गेले आहेत. तरीही संबंधित प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून सुस्त आहे. पंढरपूर -दिघंची मार्गाचे काम झाल्याने या मार्गावर वाहने अतिशय वेगाने ये-जा करतात.येथील मुख्य चौकापासून जवळच या मार्गाच्या कडेला असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री शिवाजी विद्यालया मधील विद्यार्थ्यांना या वाहतुकीपासून मोठा धोका आहे. तेव्हा या ठिकाणीही उड्डाणपूल अथवा बायपास रोड होणे आवश्यक आहे.
तुंबलेली वाहतूक अन् सतत वाजणारा सायरन
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून येथील मुख्य चौकात सायरन बसविण्यात आला आहे.गावात चोरीसारख्या घटनांची माहिती नागरिकांना ताबडतोब मिळावी यासाठी हा सायरन बसविण्यात आला आहे.मात्र सध्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा सायरन चौकात सातत्याने वाजत आहे. त्यामुळे सतत रुग्णवाहिका जात असल्याचा भास ग्रामस्थांना होतो आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हवा उड्डाणपूल किंवा बायपास रस्ता
दोन मुख्य रस्त्यांवर चौकाच्या ठिकाणी असलेल्या महूद येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.याचा प्रचंड त्रास येथील वयोवृद्ध नागरिक,महिला,शालेय विद्यार्थी, प्रवासी व नागरिकांना होत आहे.या वाहतूक कोंडीमुळे मुख्य चौकात आत्तापर्यंत अनेक जणांचा बळी गेलेला आहे.येथील नागरिकांचे बळी टाळण्यासाठी मुख्य चौकात उड्डाणपूल होणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थां मधून व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडी अन् सुस्त प्रशासन
महूदच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत आहे.याबाबत येथील स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पोलीस प्रशासन अजिबात गंभीर नाही.चौकात कधीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे स्वतः वाहन चालकास,एसटी बसच्या वाहकास खाली उतरून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे काम करावे लागते आहे.