मैदानावरच्या जिंकण्याचा ध्यास जीवनात ही उतरला पाहिजे-क्रीडामंत्री संजयजी बनसोडे; ए.सी. ए. पुणे बापूसाहेब झपके चषकाचे मानकरी

सांगोला (प्रतिनिधी):- मैदानामध्ये खेळताना असलेली चुरस,ध्यास, आपण समोरच्याला हरवू शकतो हा आत्मविश्वास आपल्या जीवनालाही आकार देत असतो. मैदानावरती जो विद्यार्थी जिंकतो तोच समाजाला योग्य आकार देत असतो,त्यामुळे जसा मैदानावर जिंकण्याचा ध्यास असतो तोच ध्यास आपल्या जीवनालाही जिंकण्यासाठी असला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री नामदार संजयजी बनसोडे यांनी केले.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरुषांच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषकाचे मानकरी ए.सी.ए. पुणे ठरले असून या स्पर्धेतील उपविजेता म्हणून जय हिंद जिमखाना कडा बीड यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.सांगोला भागातील बास्केटबॉल गुणवंत खेळाडू जहीर सलील शेख, उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू साईराज दीपक राजमाने याचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून श्री हर्षा बीड यांना देण्यात आले तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून राजेंद्र सिंग यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ऑल स्टार संभाजी नगर व पोलीस बॉईज मुंबई यामध्ये अतिशय चुरशीची लढत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झाली , ऑल स्टार संभाजीनगर या संघाने सहा गुणांनी तृतीय क्रमांक पटकावला तर पोलीस बॉईज मुंबई या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.
पुढे बोलताना क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले की सांगोल्यासाठी यापुढील काळात विविध प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन मी या ठिकाणी देत आहे.पुढच्या वर्षीच्या सामन्यात पावसामुळे कोणताही व्यत्यय येणार नाही यासाठी इनडोअर स्टेडियम उभा करण्यासाठी आत्ताच मी माझ्या क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना देत आहे., त्याचबरोबर सांगोला तालुका क्रीडा संकुलासाठी ही या पुढील काळात निधी उपलब्ध करून देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे म्हणाले की खेळाडू कधी पायात पाय घालत नाही मात्र राजकारणाची स्पर्धा सुरू होते तेव्हा पायात पाय घालण्याची स्पर्धा सुरू होते. परंतु कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी आदर्श तत्त्वांनी ही संस्था उभा केली आहे.या संस्थेने त्या तत्त्वांचा आदर्श जपला आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मंत्री माघारी जाताना रिकामे सोडायचे नाही ही सांगोल्याची पद्धत आहे,निश्चितपणे ते आपल्याकडे पाहतील असा मला विश्वास आहे.आम्ही जे मागतो आहोत ते या ठिकाणी मंजूर करावं अशी विनंती मी करतो आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की गेली ४२ वर्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धा राबवल्या जातात,अनेकांच्या सहकार्यातून त्याचबरोबर सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांच्या उत्साहातून या स्पर्धा भरवल्या जातात. बापूसाहेबांनी घालून दिलेल्या तत्त्वाने चालणारी ही संस्था आहे त्याचा तत्त्वांचा आदर्श घेऊन हे सामने भरवले जातात. यापूर्वी क्रीडांगणाला अनुदान कसे मिळाले याबाबत सांगत त्यांनी प्रमुख पाहुणे नामदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या मनाचा मोठेपणा विशद करत कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जीवनातील काही आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमासाठी सोलापूर राजूशेखर निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,उदगीरचे उद्योगपती रमेश अंबरखाने,जळकोट बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, श्याम डावळे, सांगोला तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित चव्हाण, जळकोटचे शिवसेना तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले,उद्योगपती सिद्धार्थ झपके, तहसीलदार किशोर बडवे, उद्योगपती विलास क्षीरसागर, उद्योगपती सुहास होनराव,उद्योगपती ज्ञानेश्वर तेली,उद्योगपती मंगेश म्हमाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,सामना समितीचे सचिव प्रशांत मस्के, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म .शं.घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य दिंगबर जगताप, शीला काकी झपके,विश्वेश झपके,प्रसाद झपके, गणेश पवार, सुनील धारूरकर, ऐश्वर्या झपके या सामन्यांसाठीचे पंच अजित सांगवी,एम.शफी, कपिल पाटील, सलीम शेख, रोहित देवारे शशांक गायकवाड, विशाल मगदूम, सचिन इरकर, प्रा. संजय पाटील,साधीत खराडी, नितीन चपळगावकर,व सर्व सहकारी पंच यांच्यासह सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य, विद्यामंदिर परिवारातील प्राचार्य, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद राज्यभरातून आलेले सर्व निमंत्रित खेळाडू त्यांचे मार्गदर्शक शिक्षक पत्रकार बांधव यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.पंच सत्कार निवेदन प्रशांत मस्के यांनी केले. पारितोषिक समारंभाचे निवेदन मिलिंद फाळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज पाटील-नागराळकर म्हणाले की, झपके कुटुंबा सारख्या सुसंस्कृत कुटुंबाशी माझ्या घराचं नातं जुळलं यासाठी मी भाग्यवान समजतो. तुम्ही सगळेजण जिंकण्यासाठी खेळत होता, खेळता खेळता खाली पडल्यानंतर दुसऱ्या खेळाडूंना तुम्ही उठवत होता, खेळातील ही बाब सर्वच खेळाडूंना सर्वात श्रीमंत करणारी आहे.आज आपल्या देशाला गरज आहे खरी माणसं निर्माण करण्याची आणि या अशा संस्थांच्या माध्यमातून खरी माणसं निर्माण होत आहेत. आपल्या संस्थेची खरी गरज समाजाला आहे.आमच्याकडे नामदार बनसोडे यांना अल्लाउद्दीनचा चिराग असे म्हणतात त्यांच्याकडे मागायचं आणि त्यांनी दिलं नाही असं होत नाही.