राजकारणात हार – जित होत असते कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे : विक्रम देशमुख

राजकारणात हार – जित होत असते कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे : विक्रम देशमुख
‘बूथ रचना कार्ययोजना’ अभियान राबवण्यासाठी भाजपा ची बैठक संपन्न
सांगोला / प्रतिनिधी :
पक्ष निवडणूक लढवतो, पक्ष उमेदवार ठरवतो, पक्ष उमेदवार देतो त्यानुसार निवडणूक होते. त्यामुळे उमेदवार कोणी जरी असला तरी निवडणुक ही पक्षाची असते, पक्षाच्याच सूत्राप्रमाणे ध्येयधोरणाप्रमाणे निवडणूक असली पाहिजे. यासाठी पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी आपली आणि आपल्या पक्षाची निवडणूक म्हणून जोमाने कामाला लागावे. राजकारणात हार – जित होत असते, यामध्ये अडकून न राहता कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे असे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीण पश्चिम चे जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक 2024 करिता बूथ रचना अधिक सक्षम करण्याकरिता ‘बूथ रचना कार्ययोजना’ अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांची पंढरपूर येथे बैठक पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यां शी संवाद साधताना प्रभारी विक्रम देशमुख बोलत होते.
पुढे बोलताना विक्रम देशमुख म्हणाले, पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी कोणीतरी ढगातून माणूस येणार नाही आपल्यातूनच एक उमेदवार म्हणून पुढे येत असतो. ही आपली जबाबदारी ओळखून पक्षाची किंवा एखाद्या उमेदवाराची निवडणूक म्हणून नव्हे तर ही माझी निवडणूक आहे म्हणून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमितजी शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षापासून बुथ सक्षमीकरण करण्यासाठी आपण काम करत आहोत. आज निश्चितपणाने गाव पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे. यापुढेही बुथ सक्षम करा, संवाद वाढवा, पक्षाचे विचार आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यासह ‘बूथ रचना कार्ययोजना’ अभियानामध्ये जिल्हा / मंडल संयोजकाची नियुक्ती करणे, बूथ सक्षम करणे, बूथ प्रमुख, बूथ समिती जिथे नियुक्त नाहीत तेथे त्वरीत नियुक्त करणे आदी उपक्रम राबवले जाणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी 1 जुलै ते 28 जुलै या दरम्यान मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदारांच्या घरोघरी पोहोचून मतदार नोंदणी व दुरुस्ती वगळणे आणि हरकती याबाबत वेळेत बीएलओकडे अथवा ऑनलाईन नोंदणी करून नवीन मतदारांना मतदान नोंदणी करण्यासाठी आवाहन करावे. यासाठी मतदार संपर्काचे नियोजन करावे. यासह संघटनात्मक कार्य योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान तालुका आणि गाव स्तरावरील संघटना सक्षम करून यामध्ये प्रामुख्याने बूथ सक्ष्मीकरण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल, के. के. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे आभार व सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले .
चौकट :
सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, लोकांशी संपर्क ठेवा, बुथ सक्षमीकरण करण्यावर अधिक भर द्यावा. गट – तट बाजूला सोडून कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जोमाने कामाला लागावे. कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू.
मा. चेतनसिंह केदार – सावंत
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी