पोलीस पाटलांचे प्रश्न चालू हिवाळी अधिवेशनात मार्गी लावावेत : डॉ. बाबासाहेब देशमुख
मागण्यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी संसदीय कार्यमंत्र्यांची घेतली भेट

सांगोला – पोलीस पाटलांचा पगार 20 हजार रुपये करावा या प्रमुख मागणीसह त्यांच्या इतर मागण्यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्र्यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून पोलीस पाटलांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस पाटील संघटने पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. परंतु पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्या संदर्भात राज्य शासनाने आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे. पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख, राज्य उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सांगोला तालुकाध्यक्ष गणेश खटकाळे, नानासाहेब शिंदे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी संसदीय कार्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली पोलीस पाटलांच्या विविध मागण्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. पोलीस पाटलांना दरमहा वीस हजार रुपये पगार करावा, पोलीस पाटलांची नूतनीकरण बंद करावे, प्रवास भत्ता दुप्पट करावा, कोरोना काळात मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबांना अनुकंपा कायदा लागू करावा, पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्ती वय 60 वर्षावरुन 65 वर्षे करावे अशा मागण्यांचे निवेदन सोलापूरचु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. या संदर्भात संसदीय कार्यमंत्र्यांनी चालू हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून पोलीस पाटलांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.