3 तारखेला पुणे, 4 तारखेला दिल्ली दौरा, विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचं जोरदार प्लॅनिंग
मुंबई : विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया राज्यातील पक्षांकडून चालू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी या पक्षांकडून आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील सक्रिय झाले आहेत. ते पुढच्या महिन्यात तीन आणि चार तारखेला अनुक्रमे पुणे आणि दिल्लीचा दौरा करणार आहेत.
चार ऑगस्टला दिल्लीचा दौरा
पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. ते आगामी काळात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणार आहेत. त्यासाठी ठाकरे यांनी दौरे चालू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे 3 ऑगस्ट रोजी पुण्याचा आणि त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी दिल्लीचा दौरा करणार आहेत.



