सांगोला तालुका

कॅन्सर या असाध्य रोगाला रोखता येऊ शकते- प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे

रविवार, दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रामपंचायत संगेवाडी, तालुका सांगोला, सांची मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मांजरी तालुका सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रथम युवा भवन यांचे संयुक्त विद्यमाने “महिलांमधील कर्करोग: कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय” याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगोला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व कॅन्सर संशोधक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. हे व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार संगेवाडी, तालुका सांगोला येथे सकाळी 10.00 वाजता संपन्न झाले. सदर कार्यक्रमास बहुजन नेते माननीय बापूसाहेब ठोकळे, आबासाहेब शेजाळ सर व संगेवाडी गावातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगेवाडी गावाच्या सरपंच सौ नंदादेवी वाघमारे होत्या.

प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध याविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. तसेच त्यांनी विविध ठिकाणी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्याने दिली आहेत.

कार्यक्रमा च्या सुरुवातीस प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख नितीन वाघमारे यांनी करून दिली. सदर व्याख्याना मध्ये डॉ. बनसोडे यांनी महिलांमधील स्तनांचा, गर्भाशयाचा व बीजाशयाचा कर्करोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, डोक्याचा व मानेचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत संभाव्य कारणे, प्रथमदर्शी लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कॅन्सर होण्यासाठी संभाव्य कारणे विशद करत असताना त्यांनी अनुवंशिक घटक, त्याचप्रमाणे रासायनिक, भौतिक व जैविक कार्सिनोजेन, ओनकोजेनिक विषाणू बाबत दैनंदिन जीवनातील अनेक सोपी उदाहरणे देत बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर व्याख्यानात त्यांनी विविध कर्करोगांमधील लक्षणे जसे की भूक न लागणे, वजन झपाट्याने कमी होणे, तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणे, अवयवांमध्ये जडपणा व शिथिलता जाणवणे, तोंडामध्ये लालसर पांढरे चट्टे येणे, विविध अवयवांमधून रक्तस्त्राव होणे, इत्यादी अनेक लक्षणांची विस्तृत माहिती दिली. कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब, निरोगी राहण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार, तंबाखू, धूम्रपान, दारू, गुटखा, खेनी, पान मसाला, मशेरी इत्यादीचे सेवन व तपकीर ओढणे यासारख्या व्यसनांना प्रतिबंध, मेद किंवा वसायुक्त पदार्थांना टाळणे, रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी, लसीकरण व कॅन्सर निदान याबाबत दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत महत्त्व स्पष्ट केले. बापूसाहेब ठोकळे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना साठी उपलब्ध केलेल्या विविध संधी बाबत मार्गदर्शन केले. तसेच नर्सिंग कोर्सच्या उपकरणांबाबत उपस्थितांना माहिती दिली.सदर कार्यक्रमाप्रसंगी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

आबासाहेब शेजाळ सर यांनी आपले मनोगत व आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन वाघमारे यांनी केले. समारोप प्रसंगी सांची मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत कौशल्यावर आधारित प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी महिला व युवतींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व कीट देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास सोनंद गावातील सरपंच नंदादेवी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य दिपाली नश्टे दामोदर वाघमारे, ग्रामसेवक विजयकुमार कांबळे, नामदेव वाघमारे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे, विनोद उबाळे, सुरज उबाळे व संगेवाडी पंचक्रोशीतील महिला, युवती व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!