शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

सांगोला, ता. 21 : पोलीस कर्तव्य बजावत असताना एकाने पोलीस असल्याचे माहित असूनही कॉलर पकडून पोलिसास खाली ढकलून, कर्तव्य बजावत असताना बळाचा वापर केल्याने पोलीस नाईक अंकुश नलवडे यांनी एक जनाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अंकुश नलवडे (रा. पोलीस लाईन, सांगोला) हे सांगोला पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर काम करीत आहेत. दिनांक 20 डिसेंबर रोजी सोनंद, गळवेवाडी येथे शेतीच्या वादावरून तक्रार दिल्याच्या कारणावरून घातपात करण्याच्या उद्देशाने हातात काट्या घेऊन काहीजण घरासमोर उभे असल्याचा फोन पोलीस नाईक अंकुश नलवडे यांना आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नलवडे यांनी आपल्या सोबत घेरडी दूरक्षेत्र मधील साबळे यांना मदतीला घेऊन सोनंद, गळवेवाडी येथे गेले. तेथे जमिनीच्या वादाबाबत दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे सांगितले व दखलपात्र गुन्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी उद्या पोलीस ठाण्यात हजर राहण्यासह सांगितले. पोलीस नाईक अंकुश नलवडे यांनी समजावून सांगत मोटरसायकलवरून जात असतानाच पुन्हा जोरदार आवाज ऐकू येवू लागला. फिर्यादी व आरोपी यांची मारामारी सुरू झाली होती. तेथे भांडणे सोडवण्यासाठी नलवडे आले असता गर्दीमधून एकास पोलीस असल्याचे व कर्तव्य बजावीत असल्याचे माहित असताना देखील पोलीस असला तर काय झाले? तू कोण आम्हाला सांगणार, तू इथून निघून जा असे बोलून पोलिसाचे कॉलर पकडून बाळाचा वापर करून त्यांनी नलवडे यांना ढकलून देऊन खाली पाडले.
कर्तव्य बजावत असताना बळाचा वापर करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्तव्य बजावण्यापासून परावृत केल्याप्रकरणी अंकुश नलवडे यांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.