देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (तालुका प्रतिनिधी): गेली नऊ वर्षे अविरत पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत अवघ्या विश्वात देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदराचे स्थान प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे सामान्य भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. मोदींच्या गरीब कल्याणाच्या आणि विकासाच्या अजेंड्यापुढे काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा अजेंडा निष्प्रभ ठरला आहे. देशातील मतदारांचा हा ट्रेंड येणाऱ्या लोकसभेतही कायम असेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशात चांगले काम करीत असल्याने देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवेल, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जानेवारी रोजी मतदार नोंदणी दिनानिमित्त देशामध्ये पाच हजार ठिकाणी नवमतदारांशी ऑनलाईन संवाद साधला. हा कार्यक्रम सांगोला येथे संगोला महाविद्यालय सांगोला व दिपकआबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज & महाविद्यालय कोळे ता.सांगोला येथे दोन ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. दिपकआबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज & महाविद्यालय कोळे, ता. सांगोला येथील कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार – सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, दुर्योधन हिप्परकर, विलास व्हनमाने, अमोल साखरे, शिवाजी आलदर, मोहन बजबळे, अजित तवटे, विष्णू सरगर, अमोल मोहिते, दीपक माने यांच्यासह नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांशी संवाद साधताना चेतनसिंह केदार – सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात राबविण्यात येत असलेल्या विकासात्मक योजना व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा वाढत असलेला प्रभाव याचे आकलन निश्चितच जनता करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचा आलेख उंचावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केला.
मोदींनी आत्मनिर्भर व जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. मागील साडेनऊ वर्षांत देशासाठी अनेक निर्णय घेतले त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना राबविल्या. गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा योजना राबविली आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी देशातील जनतेला नरेंद्र मोदी हवे आहेत. भाजपने देशाचा कायापालट करून दाखविला आहे. सबका साथ, सबका विकास हा मूलमंत्र डोळ्यापुढे ठेवत नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न नरेंद्र मोदी नक्कीच साकार करतील. जगाच्या पाठीवर भारताला सर्वोच्च स्थानी न्यायचे असेल तर सर्वांनी संपूर्ण ताकदीने काम केले पाहिजे, असे आवाहनही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.