मुस्लिम समाजाच्या वतीने नाझरे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाझरे येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील मुस्लिम युवकांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जय शिवाजी, जय भवानी च्या घोषणा उपस्थितांकडून देण्यात आल्या.यानंतरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासो हरिहर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले. तसेच शिवाजी भोसले,शिवभूषण ढोबळे सर यांनी उपस्थितांना कार्यक्रमप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी प्रसंग सांगत शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात असणाऱ्या मुस्लिम मावळ्यांच्या योगदानाबद्दल माहिती सांगितली . शिवरायांचे स्वराज्य हे अठरापगड जाती-धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन निर्माण झालेले होते.छत्रपती शिवरायांचे राज्य हे खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते यामध्ये समाजाचा प्रत्येक घटक सुखी समाधानी होता असे बहुमूल्य विचार यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले.
यानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांना मुस्लिम समाज तसेच सत्यशोधक समाज नाझरे यांच्यावतीने पुस्तकांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी अमर तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजा सोबतच गावचे विविध समाजातील नागरिक,आजी माजी सरपंच, उपसरपंच गावातील विविध पक्षाचे नेते शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.