लोकांची जनभावना जाणून घेतल्यावरच निर्णय घेणार- धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला(प्रतिनिधी):- जनभावना अजमाविण्याचा मी सध्या प्रयत्न करत आहे. लोकांची जनभावना जाणून घेतल्यावरच राजकीय निर्णय घेणार आहे. निवडणूक लढविणार की नाही याबाबत भाष्य टाळून प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले आमचे नेते रामराजे नाईक- निंबाळकर व विजयसिंह मोहिते हे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे.पुढे काय करायचे काय नाही हे दोघे सर्व काही ठरविणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत तिढा कायम असताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत आता प्रचारासाठी शितलदेवी मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनीदेखील गावभेट दौर्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे मोहिते पाटील आता माघारीच्या मनस्थितीत नसल्याचे वातावरण बनू लागले आहे. भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केला आहे. त्याचधर्तीवर करमाळा गावभेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल बुधवार 20 मार्च रोजी सांगोला तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यानीं सांगोला शहर, वासुद, जवळा, घेरडी, पारे, डिकसळ, हंगिरगे, वाणीचिंचाळे, वाकी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव या गावांना भेटी दिल्या. व ग्रामस्थांशी चर्चा केली.
सांगोला शहरात धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, शरदचंद्र पवार पक्ष भवन, शिवसेनेचे दत्ता सावंत, पत्रकार सतीश सावंत यांच्यासह निवासस्थानासह अनेक ठिकाणी भेटी दिल्या. विशेष म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या जवळा येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी सौ.रूपमती दिपकराव साळुंखे पाटील यांनी धैर्यशिल भैय्या यांचे स्वागत केले. मोहिते-पाटील व साळुंखे पाटील परीवाराने राजकारणाच्या पलीकडील पारीवारीक संबध जोपासले असल्याची चर्चा यावेळी ऐकावयास मिळाली.
यावेळी नागरिकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. आता भाजप सोडा आणि शरद पवार यांची तुतारी हाती घ्या कारण, सध्या राज्यात भाजप विरोधी वातावरण आहे अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते यांना पक्षाचे तिकीट मिळणार की ते बंडखोरी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.