बचत गटातील महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला नगरपरिषदे अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान केंद्र पुरस्कृत योजना कार्यरत आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी गरीब नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याचे काम केले जाते. सदर योजनेच्या अंतर्गत सांगोला शहरांमध्ये 200 पेक्षा जास्त बचत गटांची स्थापना करण्यात आलेले आहे. सदर बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाय विषयी माहिती देऊन आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 मार्च ते 14 मार्च 2024 असे तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन सांगोला नगरपरिषद सभागृह येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये महिलांना विविध व्यवसायासंबंधी माहिती, उत्पादित वस्तूंच्या विक्री करिता बाजारपेठेचा अभ्यास, विविध मशिनरी, लेबलिंग, पॅकेजिंग व विविध शासकीय योजनांची माहिती संबंधित तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यात आली. या उद्योजकता विकास कार्यक्रमास श्री श्रावण रावणकुळे, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्री दीपक गवळी, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक श्री कुणाल पाटील इत्यादी प्रमुख प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी कर्तव्ये शहर स्तर संघाच्या अध्यक्ष सौ सुनंदा घोंगडे या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री स्वप्निल हाके, कार्यालयीन अधीक्षक, योगेश गंगाधरे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी,बिराप्पा हाके, समुदाय संघटक यांनी केले.
बचत गटातील महिलांकरिता विविध उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता नगरपरिषदेने हे तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचा निश्चितच बचत गटातील सर्व महिलांना लाभ होईल.
डॉ. सुधीर गवळी,मुख्याधिकारी तथा प्रशासक,नगरपरिषद, सांगोला