बालकाचे प्राण वाचविणाऱ्या दोघांचा आपुलकीकडून सत्कार

सांगोला ( प्रतिनिधी )- खेळत खेळत विहिरीत पडलेल्या अडीच वर्षीय बालकाचे प्राण वाचविणाऱ्या मयुरेश मुकुंद कुरुलकर व डॉ. कु. सीमा सोमनाथ साळुंखे यांचा आपुलकी प्रतिष्ठानकडून सत्कार करण्यात आला.
सांगोला शहरातील कुंभार गल्ली येथे वास्तव्यास असलेले नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांचा नातू व सागर साळुंखे यांचा अडीच वर्षाचा मुलगा चि. धैर्य शुक्रवारी ( दि.२ ) दुपारी खेळत खेळत घरासमोर असलेल्या सतीच्या विहिरीत पडला. त्याची शोधाशोध सुरु असतानाच शेजारी राहणाऱ्या मयुरेश कुरुलकर याचे लक्ष विहिरीकडे गेले. मयुरेश व मुलाची आत्या डॉ. सीमा सोमनाथ साळुंखे यांनी पाण्यावर तरंगत असलेल्या धैर्य यांस विहिरीत उतरून बाहेर काढले. डॉ. सीमा यांनी तातडीने चि. धैर्य याचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वेळीच खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे चि. धैर्यचे प्राण वाचले.
याची दखल घेत आपुलकी प्रतिष्ठान व शहीद जवान बहुद्देशीय संघटना यांच्या वतीने मयुरेश कुरुलकर व डॉ. कु. सीमा साळुंखे यांचा शाल व गुलाब रोप देऊन सत्कार केला तसेच दोघांनी प्रसंगावधान राखून केलेल्या कार्याचे कौतुकही केले.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, शहीद जवान बहुद्देशीय संघटनेचे अध्यक्ष तथा आपुलकी सदस्य अच्युत फुले, इंजि. विकास देशपांडे, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, वसंतराव सुपेकर, प्रमोदकाका दौंडे, अमर कुलकर्णी, प्रसन्न कदम, सोमनाथ माळी आदी सदस्य तसेच कुरुलकर व साळुंखे कुटुंबीय उपस्थित होते.
कुंभार गल्ली येथे असलेल्या या सतीच्या विहिरीत यापूर्वीही अनेकजण पडले होते. सुदैवाने प्राणहानी झाली नसली, तरीही भविष्यात असे प्रकार घडून दुर्घटना होऊ नये म्हणून विहिरीला संरक्षक जाळी बसवावी तसेच या विहिरीतील गाळ काढून आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई काळात कुंभार गल्लीतील नागरिकांना या विहिरीचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आपुलकीच्या वतीने करणार आहे.
-राजेंद्र यादव ( अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला )