महाराष्ट्रातील मराठी भाषिक तरुणांनी रेल्वे भरतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत: श्री प्रशांत विभुते

प्रतिनिधी: रेल्वे विभाग हा भारतातील सर्वात मोठा विभाग असून, इतर विभागाच्या तुलनेत रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणात भरतीच्या जाहिराती निघतात परंतु त्यामध्ये बिहार यु.पी.च्या तुलनेत महाराष्ट्रातील मुले कमी प्रमाणात भरती होतात. त्यामुळे रेल्वे विभागात मराठी मुलांचे प्रमाण कमी असलेले दिसते. म्हणून महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील मराठी मुलांनी रेल्वे भरतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत तरच नोकरीच्या संधी मराठी मुलांसाठी उपलब्ध होतील असे मत जत रोड रेल्वे स्टेशन वाळेखिंडीचे स्टेशन मास्तर श्री. प्रशांत विभुते यांनी व्यक्त केले.
सांगोला महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा करिअर सुमपदेशन व मार्गदर्शन कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 30 सप्टेंबर 2024 रोजी रेल्वे विभागातील भरतीच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव मा. श्री. म.सी. झिरपे व संस्था सदस्य श्री. सुरेश फुले उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना श्री. विभुते यांनी रेल्वेतील विविध विभाग प्रशासकीय पदे भरती व त्यासाठीचा अभ्यासक्रम याविषयी मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे व यश प्राप्ती करावी असे आवाहन केले. संस्था सदस्य श्री. सुरेश फुले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रेल्वे भरतीसाठी फार्म भरावेत व त्यासाठी नियोजन करून भारती प्रक्रियेत उतरावे असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ.जमीर तांबोळी यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. गणेश पैलवान यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विशाल कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. बबन गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ..रमेश बुगड, डॉ.अर्जुन मासाळ, डॉ.रमेश टेंभुर्णी, डॉ.रेणुकाचार्य खानापुरे, प्राध्यापिका तेजश्री मिसाळ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.