महाराष्ट्र

महूद येथे सांगोला पोलिसांनी हटवली अतिक्रमणे

महूद, ता. ५ : सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी महूद येथील मुख्य चौक परिसरात मुख्य रस्त्यावर असलेली दुकाने,दुकानांचे बोर्ड,विक्रेते यांना हटविण्यात आले.या कारवाईचे येथील सामान्य नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे मुख्य चौकाने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक सुरळीत मदत होणार आहे.

 

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगोला शहरासह तालुक्याच्या विविध मोठ्या गावांमध्ये पोलीस फौज फाट्यासह जाऊन अशी धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस फौजफाटा महूद येथे दाखल झाला.जत ते मुंबई आणि सोलापूर ते चिपळूण या मार्गावरील महूद हे चौकाचे गाव आहे. दोन्ही कडील मार्गांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.मात्र महूद चौकाच्या ठिकाणी अनेक दुकानदारांनी, विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावरच आपला व्यवसाय थाटला आहे.तर सर्वच गाळेधारक दुकानदारांनी सावलीच्या नावाखाली मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावर व त्यापुढे जावून अतिक्रमण केले आहे.अनेक दुकानदारांनी आपल्या नावाचे फलक मुख्य रस्त्यावरच रोवले आहेत.चार चाकी मालवाहतूक वाहनांनी तर मुख्य चौकालगत रस्त्यावरच आपला वाहनतळ निर्माण केला आहे.या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूर ते दिघंची आणि काम सुरू असलेल्या सांगोला ते महूद मार्गावर चौकाच्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. सणवाराच्या प्रसंगी ही वाहतूक कोंडी आणखीनच भीषण होते आहे.रस्ते प्रशस्त होऊनही महूद चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य वयोवृद्ध नागरिक,विद्यार्थी, रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 

ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी येथे पोलीस वाहतूक शाखेचा कोणताही कर्मचारी उपलब्ध नसतो. पोलीस पाटील यांच्या योगदानातून येथे बसविण्यात आलेल्या सायरनच्या आवाजाने ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. हा सायरन सातत्याने वाजत राहतो.आज पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उभारलेलु दुकाने, फलक हटविले आहेत.यामुळे मुख्य चौक परिसरात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर ही कारवाई करण्यात आली.


कारवाईचे सामान्य नागरिकांतून स्वागत

 

महूद चौक हा सर्व अनाधिकृत गोष्टींचा अड्डा बनला आहे. अशा अनाधिकृत गोष्टींवर गेल्या वीस वर्षात कोणतीही कारवाई झाली नाही.आज झालेल्या कारवाई दरम्यान काही ठिकाणी पोलीस प्रशासनालाही धमकाविण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरीही अनेक वर्षांनी अशा प्रकारच्या झालेल्या कारवाईमुळे येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात असल्याचे सांगत सांगोला पोलिसांनी अनाधिकृत बाबींवर केलेल्या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होईल आणि अपघात टाळता येतील.येथील प्राथमिक शाळा परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी वेढा टाकला आहे. तेथे या विक्रेत्यांनी बसू नये अशा प्रकारच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत.


ही कारवाई सुरूच राहणार 

आपण सांगोला पोलीस स्टेशनला असेपर्यंत सामान्य नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारची कारवाई कायमच केली जाईल.- विनोद घुगे, पोलीस निरीक्षक सांगोला


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button