कष्टाला पर्याय फक्त कष्टच- डॉ. विठ्ठल लहाने; गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- गरिबीमुळेच आम्ही मोठे झालो,जीवनात वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे.कठीण प्रसंगी आपण कर्तव्याप्रती तत्पर, जागरूक राहिले पाहिजे. कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी १९५२ चा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कठीण काळ लक्षात घेऊन अतिशय मेहनतीने,कष्टाने सांगोला विद्यामंदिर सुरू केले. सांगोल्याच्या गोरगरीब जनतेसाठी, त्यांच्या लेकरांसाठी केलेले कार्य  संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरले. त्यामुळे जीवनात कष्टामुळेच सगळ्या गोष्टी साध्य होतात, कष्टाला पर्याय फक्त कष्टच असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४३ व्या स्मृती समारोह सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.

       पुढे बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. लहाने यांनी संस्थेचे अध्यक्ष झपके सर हे मेरीट जपणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे संस्थाध्यक्ष आहेत असे कौतुक केले.  व चांगल्याचे कौतुक, सत्कार शाबासकीने मिळणारी प्रेरणा, चांगल्या कार्यात सातत्य ठेवणे, उत्तुंग ध्येय ठेऊन जगण्यासाठी अहोरात्र मेहनत करा, सामाजिक भान राखत सेवा द्या, जमिनीवर रहा, माणसातला चांगुलपणा शोधा, आई वडील व शिक्षक नेहमी चांगले चिंततात त्यामुळे सर्वांना अभिमान वाटेल असा विद्यार्थी, मुलगा, नागरिक व्हा. असे मौलिक विचार सांगत संधीच्या गोष्टीतून उपस्थितांना  कमालीची प्रेरणा दिली.

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. प्रास्तविकातून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी शिष्यवृत्ती गुणवत्तेत अव्वल राहत जिल्ह्यात सांगोला विद्यामंदिरची ब्रँड म्हणून ओळख असून निकालाची परंपरा उज्ज्वल राखण्याचा प्रयत्न करणारे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी अत्यंत व्यस्त जीवनशैलीतून आपला अनमोल वेळ उपलब्ध करत डॉ.विठ्ठलराव लहाने यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करत स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.धनाजी चव्हाण यांनी करून दिली.मिलिंद फाळके यांनी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रियेची माहिती दिली.त्यानंतर “कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक” पुरस्कार मांजरी हायस्कूल मांजरी, तालुका-सांगोला येथील कार्यरत शिक्षक सुनील भिकू बनसोडे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,  सांगोल्याचे बापूजी चरित्र ग्रंथ व रोख रुपये ११००० देऊन प्रदान करण्यात आला.

यावेळी सुनील बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून पश्चिम महाराष्ट्रातील आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार मला मिळाला याचा मनस्वी आनंद आहे असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील निलेश नंदकुमार जंगम,गणेश महादेव हुंडेकरी, प्रा.माधुरी अरुण पैलवान, कोळा विद्यामंदिर हायस्कूलमधील नमिता विनोद देशमुख, नाझरा विद्यामंदिर प्रशालेमधील दिलीप रामचंद्र सरगर, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील स्वाती बापू गाढवे, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुकेशिनी राजाराम नागटिळक यांना संस्थांतर्गत गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील दत्तात्रय शामराव जाधव व सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील भारत सुखदेव पवार यांना  गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, बुके व चरित्र ग्रंथ देत कुटुंबीयांसह सन्मानित करण्यात आले.यासंदर्भातील निवेदन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.

यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळास देणगी दिल्याबद्दल प्रा.निलेश नागणे व प्रा.जालिंदर मिसाळ या देणगीदारांचा कुटुंबीयांसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी संस्था कार्यकारिणी सदस्य प्रफुल्लचंद्र झपके,विश्वेश झपके,संस्था सदस्य,  सांगोल्यातील प्रतिष्ठित नागरिक, झपके कुटुंबीय, विद्यामंदिर परिवारातील सर्व सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यमान प्रशासकीय अधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचा सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार  प्राचार्य अमोल गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button