*नागपंचमी सणाचा साक्षीदार अखेर कोसळला…*

नाझरा(सुनील जवंजाळ):- भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.प्रत्येक सणाची काही ना काही वेगळी वैशिष्ट्ये जपली जातात.स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे नागपंचमीचा सण.याच नागपंचमीच्या सणाला विविध प्रकारच्या खेळांबरोबरच झाडाला उंच टांगलेला झोका स्त्रियांच्या जगण्याला भावनिक व सामाजिक उंची वरती घेऊन जातो. गेली सात आठ दशक चोपडी येथील चंद्रशेखर बाबर यांच्या घरासमोर असणार लिंबाचे झाड नागपंचमीच्या सणाला झोक्याचा आधार देत होतं. मोठं आणि उंच असणाऱ्या या झाडाला झोका बांधून गावातील अनेक युवती व माहेर वाशिन झाडावर झोका घेत होत्या.याच झोक्याच्या संदर्भात माहेरकडच्या असंख्य आठवणी सासरी चर्चेला जायच्या. नागपंचमीच्या सणा दिवशी गावातील,वाडी वस्त्यांवरील व विविध ठिकाणी असणाऱ्या मळ्यातून येणाऱ्या अनेक महिला या झोक्यावरती झोके घेत जगण्याला समृद्ध बनवायच्या. गेली पाच ते सात दशक ज्या झाडावरती हा झोका बांधला जायचा ते झाड काल रात्री झालेल्या वादळाने ऊनमळून पडलं आणि अनेक महिलांचा झोका जमिनीवर पडला. अनेकांसाठी सावलीचा आधार असणार हे झाड रात्री उनमळून पडलं.
यादव आप्पा व चंद्रशेखर बाबर यांच्या घरासमोर असणार हे झाड, ज्या झाडाखाली उन्हाळ्याच्या सुट्टीत असंख्य चिमुकले विविध प्रकारचे खेळ खेळत होते. अनेक लोक आपल्या दुचाकी चार चाकी याच झाडाखाली ठेवत होते.. एक हक्काची सावली रात्री उनमळून पडली. सकाळी अनेकांनी झाडाच्या अशा उनमळून पडण्याचे दुःख व्यक्त केलं.पडलेल्या झाडासमोर अनेकांनी या झाडाच्या संदर्भात असलेल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. रात्री हे झाड पडत असताना चंद्रशेखर बाबर व यादव आप्पा यांच्या घरात बाळासाहेब देसाई विद्यालयाचे कर्मचारी संतोष चव्हाण हे वास्तव्यास होते.
अगदी हळुवारपणे या झाडाने आपला देह या दोन्ही घरावरती ठेवला. घरावरती झाड पडल्यानंतर संतोष चव्हाण यांच्या घराचा दरवाजा पॅक झाला अशा वेळी तेथील शेजाऱ्यांनी धावत येऊन तात्काळ दरवाज्याच्या आड असणारी फांदी तोडत दोन मुलांसह सह पत्नी त्यांना बाहेर काढले. चंद्रशेखर बाबर यांच्या माळी वरती झाडाची एक फांदी व यादव आप्पा यांच्या माळी वरती झाडाची दुसरी फांदी पडल्याने मोठा अनर्थ टळला जर एकाच घरावरती हे झाड कोसळलं असतं तर काय झालं असतं हे सांगता न येण्यासारखा आहे. एकंदरीतच सहा-सात दशक सोबत असणार हे झाड एका रात्रीच्या वादळाने उनमळून टाकल्याने अनेकांनी याबाबत प्रचंड हळहळ व्यक्त केली. नागपंचमीचा झोका आणि चिमुकल्यांचे या झाडाखालचे खेळ अखेर संपले अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली.