उत्कर्ष विद्यालयातील निसर्ग कुलातील विद्यार्थ्यांनी घेतला निसर्गाचा आनंद; उत्कर्ष विद्यालयाची निसर्गसंवर्धन यात्रा संपन्न

उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या निसर्ग कुलातील 84 विद्यार्थ्यांनी
वाढेगाव येथील त्रिवेणी संगमाला भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला. 29 जुलै हा दिवस निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून संस्था अध्यक्ष डॉ.संजीवनी केळकर व विद्यालयाचे मुख्याध्यापक- श्री. सुनील कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व समजावे वृक्षारोपणाचा हेतू समजावा व प्रदूषण कमी होण्यासाठी सायकलचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने सायकल रॅलीचे नियोजन करण्यात आलेले होते.
या सायकल रॅलीचे उद्घाटन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका- मागाडे मॅडम, उपमुख्याध्यापिका -कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते करून निसर्ग संवर्धन रॅलीला सुरुवात झाली .रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी जे सीड्स बॉल तयार केलेले होते ते रस्त्याच्या कडेने असलेल्या मातीच्या चाऱ्यांमधून टाकून एक प्रकारचा वृक्षारोपणाचा आनंद घेतला .वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावर रॅली पोहोचल्यानंतर शंभू महादेवाचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांना माण नदीची सखोल माहिती, माणनदी परिक्रमा अध्यक्ष- वैजीनाथ काका घोंगडे यांनी दिली. व विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. ंत्याच वेळेला सर्पमित्र श्री. ऐवळे यांनी विषारी साप व वेगवेगळ्या प्रकारांच्या सापांबद्दलची माहिती दिली व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी साप हाताळले .
नदीच्या काठी असलेल्या मोठ्या मोठ्या झाडांच्या पारंब्याचा मुलांनी खेळून मुक्त आनंद घेतला व आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला .खेळून दमल्यानंतर मुला- मुलींनी भोजनाचा व शाळेने दिलेल्या खाऊचा आस्वाद घेतला .
या रॅलीचे सुंदर असे स्वागत इयत्ता- तिसरीच्या प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषामध्ये केले. या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन निसर्ग कुलाचे मार्गदर्शक- मिसाळ सर, कुंभार सर ,भिंगार्डे सर, गोतसूर्य सर व कडव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते . शिक्षकांसोबत मुलांना निसर्गाची शाळा अनुभवता आली.