मान्सूनचे रहस्य….
मे महिना संपत आला की, आपल्याला मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतात. हवामान खातेही सतर्क त्यांच्याकडून रोज मान्सूनच्या आगमनाचे अंदाजही व्यक्त होत असतात.पावसाळा सुरू होवून महिना होत आला.जूनच्या दुसर्या आठवड्यात पाऊस चांगला झाला मात्र आता पावसाने दडी मारली आहे.पाऊस घेवून येताना आणि पावसाने दडी मारल्यानंतरही आपल्याला मान्सूनची आठवण यायला लागते. आपल्या जीवनात मान्सूनचे इतके महत्व आहे.कारण पाणीच नाही मिळाले तर काय करणार? भारतातील अर्थकारण, समाजजीवन, संस्कृती सारे काही ज्या मोसमी वार्यांभोवती फिरते, त्याचा अभ्यास जगभरातील तज्ज्ञ इसवी सन पूर्व काळापासून करत आले आहेत, मात्र त्याविषयीची उत्सुकता आजही कायम आहे.
मान्सून हे एक प्रकारचे वारेच. पण त्यावर भारतीयांचे अस्तित्व , भावना आणि स्वप्ने अवलंबून असतात. ‘मान्सून’ किंवा मोसमी वारे हा शब्द मूळच्या ‘मौसम’ या अरबी शब्दावरून आलेला आहे. तशी या वार्याची माहिती जगाला फार पूर्वीपासून होती. इ. स. पूर्व 334 मध्ये अरिस्टॉटलने ‘अरबी समुद्रात अव्याहतपणे आलटून-पालटून पूर्व व पश्चिमेकडून वाहणार्या’ वार्यांचा उल्लेख केला आहे. अलेक्झांडरचा सेनापती निआर्कस हा भारताकडील सागरी मार्गाचा आद्य प्रणेता मानला जातो. इ. स. पूर्व 324 मध्ये सिंधू नदीच्या मुखापासून सागरी मार्गाने परत जाताना तो ‘पश्चिमेकडून येणारे वारे’ थांबेपर्यंत अडकून पडला होता. पण मान्सून वार्यांच्या शोधाचे श्रेय मात्र पहिल्या शतकातील ‘हिप्पालस’ या ग्रीक नाविक व व्यापार्याला दिले जाते.
‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या पहिल्या शतकातील प्रसिद्ध संदर्भग्रंथात त्चाचा उल्लेख आढळतो,असे जाणकार सांगतात. पुढे आठव्या ते बाराव्या शतकातील अब्बासी खलिफांच्या राजवटीत मोठी जहाजे उन्हाळ्यात पश्चिमेकडून येणार्या वार्यासोबतच अरबस्तानातून भारताकडे येत. दहाव्या शतकात अल मसुदी या अरब भूसंशोधकाने अरबी समुद्रातील पूर्व व पश्चिमी अशा आलटूनपालटून वाहणार्या वार्यांचे वर्णन केले आहे. याच काळात चोल राजवटीत आग्नेय आशियाई भागाकडे मोठा व्यापार व लष्करी मोहिमा होत असत. अर्थातच त्यासाठी मान्सून व इतर वार्यांचे ज्ञान आवश्यक होते. पण त्यांच्या नाविक प्रवासाचे वेळापत्रक व इतर तपशील यांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. पंधराव्या शतकातील अरब कवी, नकाशा व भूगोलतज्ञ इब्न माजिद याला अरबी समुद्रातील सागरी प्रवासाचे ज्ञान होते. वास्को द गामाला त्यानेच भारताचा मार्ग दाखवला, असे मानले जाते. नंतर मात्र पोर्तुगीज, अरब व इतर युरोपीय व्यापारी आणि भूसंशोधकांनी मोसमी वार्यांचे वेळापत्रक, दिशा इत्यादीचे सखोल ज्ञान मिळवले. त्याच्या जहाजांच्या लॉग बुकमधील नोंदी व माहितीपत्र्ाके ही एक मौल्यवान संपत्ती किंवा ‘ट्रेड सिक्रेट’ मानले जाई.
या ज्ञानाच्या आधारेच पुढे पोर्तुगीजांसह, डच, फ्रेंच आणि इंग्रज इत्यादींच्या भारताकडील सागरी प्रवास व व्यापाराचे प्रमाण वाढले. एकंदरीत जहाजांनाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही दिशा देण्यात मान्सून वार्यांचा महत्वाचा वाटा होता. पण त्यांची निर्मिती कशी व का होते, याचे स्पष्टीकरण मात्र हजारो वर्षे कुणालाही माहीत नव्हते. हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणार्या एडमंड हॅले यांनी रॉयल सोसायटीच्या सूचनेवरून भारतीय मान्सूनच्या पॅटर्नचा अभ्यास केला व 1786 मध्ये त्यावर एक ग्रंथ प्रसिद्ध केला. सूर्याच्या उष्णतेमुळे हिंदी महासागराचे पाणी आणि दक्षिण आशियाची भूमी हे कमी-अधिक तापतात. त्यातून मान्सून वारे भारताच्या दिशेने वाहतात, असे स्पष्टीकरण हॅले यांनी दिले. ते मूलत: बरोबर होते,असा जाणकरांचा दावा आहे. 1735 मध्ये जॉर्ज हेडली यांनी भारतीय उपखंडात मान्सूननंतर वाहणार्या ईशान्य व्यापारी वार्यांचे स्पष्टीकरण दिले. 1817 मध्ये थोर जर्मन भूगोलसंशोधक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी भारतात मान्सून व ईशान्य व्यापारी वारे आलटूनपालटून वाहण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले.
1875 मध्ये भारतात भारतीय हवामान खात्यााची स्थापना झाली. गावोगावी अनेक वेधशाळा उभारण्यात आल्या. वरील सर्व प्रयत्ना मान्सूनचे रहस्य बरेचसे उलगडले आहे. विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूपाने पडतात. त्यामुळे तेथील तापमान वाढून कमी भाराचा पट्टा तयार होतो, त्याला ‘डॉल्ड्रम’ म्हणतात. वारे जास्त भाराकडून कमी भाराकडे वाहतात. यामुळे वर्षभर कर्कवृत्त व मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे वारे वाहतात. त्यांना ‘व्यापारी वारे’ म्हणतात. उत्तर गोलार्धातील व्यापारी वार्यांना ईशान्य व्यापारी वारे तर दक्षिण गोलार्धात आग्नेय व्यापारी वारे म्हणतात. खरे तर हे वारे वर्षभर वाहायला हवेत. पण उत्तरायणाच्या काळात पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकू लागतो. त्यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकत अखेर 21 जून रोजी सूर्यकिरणो कर्कवृत्तावर लंबरूप पाडतात. अर्थातच विषुववृत्तावरील डॉल्ड्रम हा कमी भाराचा पट्टाही कर्कवृत्तावर सरकतो. आता दक्षिण गोलार्धातील मकरवृत्तावरून येणारे आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्तावर आले तरी तिथे कमी भाराचा डॉल्ड्रम नसतो. यामुळे हे वारे विषुववृत्त ओलांडून कर्कवृत्ताकडे जाऊ लागतात. पण विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात येताच त्यांची दिशा बदलते.
फेरेलच्या नियमानुसार पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धातील वारे उजवीकडे वळतात. त्यानुसार आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडताच नैर्ऋत्येाकडून ईशान्येकडे वाहू लागतात. त्यामुळे त्यांना ‘नैर्ऋत्य मान्सून वारे’ म्हणतात. ते जूनपासून समुद्रावरून भारतीय उपखंडावर येतात. तेच नैर्ऋत्य मान्सून वारे. पुढे 23 सप्टेंबर रोजी डॉल्ड्रम परत विषुववृत्तावर येतो. त्याामुळे हे नैर्ऋत्य वारे वाहायचे थांबून नेहमीप्रमाणे ईशान्य व्यापारी वारे वाहू लागतात. असाच प्रकार ईशान्य व्यापारी वार्यांच्या बाबतीत दक्षिण गोलार्धात होतो. जानेवारी ते एप्रिल या काळात ते विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धात जातात व वायव्य मान्सून वारे म्हणून वाहू लागतात.या विवेचनावरून भारतात 80 टक्के पाऊस पावसाळयाच्या चारच महिन्यांत का पडतो हे स्पष्ट होईल.
‘मी खूप पावसाळे पाहिलेले आहेत’ या वाक्प्रचारात ‘पावसाळे’च का, हिवाळे किंवा उन्हाळे का नाहीत, याचे कारण मान्सूनच्या स्वरूपात दडलेले आहे. अनिश्चितता, अनियमितता, केंद्रितता व वितरणातील असमानता ही मान्सूनची वैशिष्टये आहेत. म्हणजे त्यााचे आगमन व परतीची तारीख, तसेच तो कुठे, केव्हा, किती व कसा बरसणार हे कधीही नक्की नसते. त्यामुळे पूर, अवर्षण, अतिवृष्टी, वीज पडणे, पेरण्या वाया जाणे, भरघोस उत्पादन, प्रवासातील अडथळे, आजारपणे, साथीचे आजार, संकटे, त्याावर मात यासह आशा- निराशेचे खेळ- असे कितीतरी जीवनानुभव केवळ या चार महिन्यांत माणसाला येऊन जातात. म्हणूनच माणसाची अनुभवसमृद्धी ही पावसाळयाच्या संदर्भातच मोजली जाते. नाही तरी युगानुयुगे शेतीप्रधान भारतातील कोटयवधी लोकांची समृद्धी आणि गरिबी, सुखे आणि दु:खे यांचा मान्सून हाच खेळीया राहिलेला आहे. ही सारी निसर्गाची अद्भूत किमया आहे हे किती लोकांना ठाऊक आहे.आपल्या जीवनात ज्याचे महत्व आहे,त्यालाच आपण विसरून बसलो आहोत.