सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयाचा 46 वा वर्धापन दिन व पारितोषिक वितरण गुरुवार दि. 08/08/2024 रोजी सकाळी 10.30 वा. संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते प्रा. संभाजी देसाई (सातारा) हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मा.श्री. बाबुराव गायकवाड होते. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष मा.श्री. प्रा. पी.सी. झपके, सचिव मा. श्री. म. सि. झिरपे, सहसेक्रेटरी मा.श्री.साहेबराव ढेकळे, संस्था कार्यकारणी सदस्य् मा.श्री. सुरेश फुले, मा.श्री.शामराव लांडगे, मा.श्री. सोमनाथ ढोले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, माजी प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. संभाजी देसाई म्हणाले की, स्वर्गीय बापूसाहेब झपके, संभाजीराव शेंडे आणि बजरंगआबा लोखंडे यांच्या त्यागातून व सध्याचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या निस्वार्थी वृत्तीमुळे महाविद्यालय उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टी मोबाईल, निराशावाद यातून बाहेर पडले पाहिजे. ग्रंथालयाचा वापर करून स्वतःबरोबर आपल्या आई-वडिलांचे व संस्थेचे नाव उज्वल केले पाहिजे. यावेळी त्यांनी शहीद भगतसिंग यांची देशप्रेमाची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आजचा विद्यार्थी संस्कारक्षम बनला नाही तर त्याला भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल असे सांगितले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्था अध्यक्ष मा.श्री. बाबुरावजी गायकवाड म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरवलेल्या अनेक सुविधांचा वापर अधिक प्रभावीपणे केला पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना आपले व्यक्तिमत्व तयार होते त्यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुविधा पुरवते. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांचा गौरव केला.
आपल्या मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते ते महाविद्यालय पुरवित आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्रगती विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. विजयकुमार गाडेकर यांनी करून दिला. अहवाल वाचन कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष लोंढे यांनी केले. आभार डॉ. विद्या जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. कॅप्टन संतोष कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा गुणगौरव करून प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. सकाळी महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रेरणा, , गॅलेक्सी व कॉसमॉस या भित्तीपत्रकांचे उद्घाटन मान्यवर व प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वर्धापन दिनाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष लोंढे व कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.