माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांचे ‘संयम’ प्रशिक्षण संपन्न

सांगोला तालुक्यात माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे बारा ते अठरा वयोगटातील किशोर किशोरींसाठी ‘किशोर किशोरी विकास वर्ग’ सुरु आहेत. त्यामध्ये किशोर किशोरींच्या व्यक्तिमत्व विकास वाढीचे उपक्रम घेतले जातात. सांगोल्यामध्ये संस्थेचे ८ किशोरी वर्ग व सांगोला, महूद, गार्डी व आचकदानी येथे 5 किशोर वर्ग सुरु आहेत.

सांगोल्याच्या आसपासच्या ग्रामीण भागात किशोर- किशोरींना या वर्गाची अत्यंत गरज भासते. त्यांना मार्गदर्शन मिळावे व पुढील पिढी ही सुजाण नागरिकाची घडावी यासाठी किशोर – किशोरी वर्ग सुरु करणे गरजेचे आहे. हे वर्ग घेणाऱ्या शिक्षिकांना संस्थे मार्फत वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.रविवार दि. १४/७/२०२४ ते बुधवार दि. १७/७/२०२४ अखेर ज्ञानप्रबोधीनी, पुणे यांचे ‘संयम’ या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

समाजातील वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांची आत्महत्येचे प्रमाण, मुलांमधील वाढते व्यसनांचे प्रमाण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, लैंगिक शोषण, अशा अनेक नवीन पिढीच्या नवीन समस्या, आपल्याला रोज दिसून येतात. या समस्या पासून आपल्या मुलांना कसे दूर ठेवायचे तसेच या अशा समस्यांमध्ये आपली मुले गुरफूटू नये यासाठीच पालकांनी आणि शिक्षकांनी काय काळजी घ्यावी याचे कृतिशील मार्गदर्शन या कार्यशाळेतून ‘संयम’ प्रकल्पाच्या प्रमुख मा. अनघा लवळेकर यांच्या सहकारी सुजाता गोखले व शमांगी देशपांडे यांनी करून दिले.
आपले जीवन हे पंचकोशाशी निगडीत आहे. ते पंचकोश कोणते? त्यामध्ये अन्नमयकोष, मनोमय कोश, प्राणमयकोश, विज्ञानमय कोश ,आणि आनंदमयकोश. यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण उत्तम कशी होते तसेच किशोरवयीन मुलांमुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल यावर विस्तृतरित्या माहिती सांगून या वयात आपण त्यांच्याशी कशा प्रकारे वागायचे याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मैत्री, प्रेम व आकर्षण यातील फरक सांगून मैत्रीमध्ये कशाप्रकारे आपले वागणे, बोलणे पाहिजे. तसेच गुड टच व बॅड टच याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच यातून घडणारे लैंगिक दूरवर्तन यासारख्या नाजूक विषयावर देखील अचूक माहिती दिली.

व्यसन, व्यसनाचे विविध प्रकार, व्यसन कसे लागते, त्यापासून आपल्या मुलांना कसे दूर ठेवता येईल, व्यसनाचे दुष्परिणाम याबाबत ppt द्वारे माहिती सांगितली. प्रसार माध्यमे कोणती, सोशल मीडिया व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात होणारा उपयोग व दुरुपयोग, सध्याच्या जीवनात मोबाईल व इंटरनेट यांचा कसा गैरवापर केला जातो व त्याचा आपल्या जीवनाच्या प्रगतीवर कशाप्रकारे परिणाम होतो, या सर्व गोष्टींवर त्यांनी छोट्या छोट्या फिल्म द्वारे, उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून उपक्रम करून घेत, तसेच स्वतः छोटे छोटे प्रसंग सादर करून उत्कृष्टपणे आणि परिणामकारकरित्या केलेले मार्गदर्शन तिथे उपस्थित असलेल्यांच्या मनावर बिंबवले. तसेच स्त्री-पुरुष परस्पर पूरकता, आणि या धावपळीच्या युगात, दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीत, संयम असेल तर प्रत्येक जण कसे सुरक्षित राहतो ते या प्रकल्पातून जाणवून दिले. ‘संयम’ आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे मुलांच्या मनावर बिंबविणे किती महत्वाचे आहे हे या कार्यशाळेतून सांगण्याचा प्रयत्न केला.

आपल्या मुलांच्या तुलनेत आपले बालपण सोपे होते. आजच्यासारख्या स्पर्धा, प्रलोभणे आणि नवनवीन व्यसनांचे प्रकार त्यावेळी नव्हते. परंतु आज आपल्या मुलांना समाजात वावरताना या गोष्टींना तोंड द्यावे लागते. मुलांना सहजगत्या या जाळ्यात फसली जातात, फसवली जातात. आणि म्हणूनच समाजातील या बाह्य प्रलोभनापासून व्यसनांपासून आपल्या मुलांना कसे वाचवायचे आहे याचा मुलांच्या लहानपणापासूनच विचार केला पाहिजे. यासाठी संस्था पहिल्यापासूनच मार्गदर्शनासाठी कार्यरत आहे. यासाठीच संस्थेने किशोर – किशोरी विकास वर्ग सुरु केले आहेत. या कार्यशाळेतून उस्फुर्त होवून किशोर किशोरी विकास वर्ग सुरु करावेत व पुढील पिढी ही सुजाण नागरिकाची घडावी एवढाच संस्थेचा प्रयत्न आहे.

चार दिवस चाललेल्या या कार्यशाळेत किशोर- किशोरी विकास प्रमुख डॉ केतकी देशपांडे, संस्था अध्यक्ष डॉ. संजीवनी केळकर, उपाध्यक्षा श्रीमती माधवी देशपांडे, सचिव प्रा. निलिमा कुलकर्णी, सहसचिव सौ. वसुंधरा कुलकर्णी व कोषाध्यक्षा डॉ. शालिनी कुलकर्णी तसेच संस्था कार्यकर्त्या सौ. अश्विनी कुलकर्णी, सौ मंगल कुलकर्णी व सौ संपदा दौंडे उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे किशीर किशोरी विकास चालविणारे शिक्षिका – शिक्षक, पालक, समुपदेशक, इतर शाळेतील शिक्षक, मातृप्रबोधन सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ. रणजीत केळकर व डॉ. सुपर्णा केळकर यांनी सर्व सोयींनीयुक्त त्यांचा ‘व्यंकटेश’ हा हॉल चार दिवस उपलब्ध करून खूप मोठे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button