महूदच्या सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापला लाल सलाम… शिवसेनेत प्रवेश

सांगोला (प्रतिनिधी): शेकापमध्ये पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने तसेच शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून महूद गावच्या सरपंच संजीवनी लुबाळ, गणेश कोळेकर, विक्रम टकले, महेश‌ देशमुख, नवनाथ खांडेकर यांच्यासह शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या दोन वर्षापासून शेकापमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून पक्षातील नेतृत्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने यापूर्वी अनेक गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापूंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे महूद गटात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे.

शेकापसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या महुद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच संजीवनी कल्याण लुबाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून शेकापला अखेरचा लाल सलाम करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. शेकाप पक्षातील अंतर्गत गटबाजी व पक्षश्रेष्ठींनी गटबाजी रोखण्यास कोणताही पुढाकार न घेतल्याने तसेच महूद गावच्या विकासासाठी आपण शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश केल्याचे विद्यमान सरपंच संजीवनी लुबाळ यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, माझा तालुका, माझी जबाबदारी या भूमिकेतून तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोट्यावधींचा निधी आणला आहे. पक्ष प्रवेशाचे गणित चौकातील गड्यांना कळत नाही, तोपर्यंत त्याला राजकारण कळणार नाही. आता खोटी स्वप्नं बघू नका, आता. स्व.आबासाहेब नाहीत, स्व. आबासाहेबांच्या आडून काही जणांनी लय पचवलंय, मी तुम्हाला आजही शत्रू मानत नाही, मी ध्येयाने पुढे जाणारा ध्येयवेडा माणूस आहे. १९९० च्या निवडणुकीत, संपूर्ण तालुका हिरवागार केल्याशिवाय हा शहाजी पाटील राहणार नाही, असा शब्द दिला होता. तुमचं आणि माझं काही नाही, तुमच्या लाल बावट्याशी माझी दुष्मनी आहे, जोपर्यंत तालुक्यात लाल बावटा आहे, तोपर्यंत तालुक्यातील दुष्काळ हटणार नाही, असे मी आबासाहेबाना अनेकवेळा निक्षून सांगितलं होतं. एकदा लाल फडकं काढलं आणि तालुक्याचा दुष्काळ हटला आहे. मी १९९५ साली आमदार झाल्यावर पिण्याच्या पाण्याची शिरभावी पाणीपुरवठा योजना, टेंभू, म्हैसाळ योजना आणली. वारंवार पाठपुरावा करून ५५ हजार एकराचं पाणी टिकवून ठेवलं आहे. जवळपास ६९ गावांना शेतीचे पाणी आणले आहे. शिवसेनेचा भगवा हातात घेवून मला साथ द्या, विकासकामांसाठी पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांचा निधी आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, प्रा.संजय देशमुख, दिग्विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, संजय मेटकरी, जितेंद्र बाजारे, अजित ताटे, उमेश चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, प्रा. संजय देशमुख, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रूपनर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व आभार प्रा.अमोल नागणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button