अतिवृष्टी झालेल्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून ९ कोटी ५० लाखांचे अनुदान मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील.

मागील वर्षामध्ये सांगोला तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते यावर सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समक्ष भेटून केली होती यावर शासनाने दि ११ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय घेऊन पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. यानुसार सांगोला तालुक्यातील ५४२० लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण ९ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
एकूण लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली असून ज्या शेतकऱ्यांचे आधार नंबर बँक खात्याला जोडले नाहीत अशा शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले नाही या सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडून घ्यावा व ५० अथवा १०० रुपयांचा व्यवहार सदर बँक खात्यामध्ये करावा जेणेकरून बँक खाते चालू होऊन अनुदानाची रक्कम त्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तरी ज्यांचे अनुदान जमा झाले नाही त्यांनी त्वरित वरील प्रमाणे कार्यवाही करावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले व त्वरित अनुदान जमा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.