स्व.सुनील कांबळे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक झाली पाहिजे; सकल मातंग समाजाचा सांगोला येथे जनआक्रोश मोर्चा संपन्न

महुद बु. ता. सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित सांगोला बंदला आणि जन आक्रोश मोर्चाला समाज बांधवांच्या वतीने उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने हा ऐतिहासिक जन आक्रोश मोर्चा तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. तालुक्यातील सकल मातंग समाजातील आणि बहुजन बांधवानी या जनआक्रोश मोर्चात सहभाग नोंदवून कै. सुनिल कांबळे यांना अनोखी श्रध्दांजली अर्पण केली.
तत्पूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भवन येथे तालुक्यांतील समाज बांधव जमला होता.”सुनिल कांबळे अमर रहे”मुख्य आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहिजे “अशा घोषणा देवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध विहारातील पुतळ्यास पिडीत सुनिल कांबळे यांच्या पत्नी,मुलगा, बहिण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर जन आक्रोश मोर्चास सुरूवात झाली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून सदर मोर्चा तहसिल कार्यालयावर येवून धडकला. सदर मोर्चास विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. तालुक्यातील विविध गावातून आलेल्या सकल मातंग समाजातील युवकांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शवून सुनील कांबळे यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
महुद बु. ता. सांगोला येथील कै. सुनील कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल्या. त्या मागण्या पुढील प्रमाणे:
1)स्व.सुनील भाऊ कांबळे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक झाली पाहिजे.
2) स्व.सुनील भाऊ कांबळे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
3)सदरील खटला विशेष सरकारी वकील यांच्यामार्फत चालविला गेला पाहिजे.
4)स्व.सुनील भाऊ कांबळे यांच्या कुटुंबास महाराष्ट्र शासनाकडून 50 लाख रु.आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेतले गेले पाहिजे.
5)हत्या झाल्यापासून ते गुन्हा दाखल होईपर्यंत महूद बु!! बीटचे पोलीस कर्मचारी, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व मंगळवेढा उपविभागीय पोलीस उप-अधीक्षक यांचे कॉल तपशील नोंदी(CDR) तपासून मुख्य सूत्रधारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे.
6) सदरील हत्याकांड हे पूर्वनियोजित असून त्याचे वाढीव कलम आरोप पत्रात लावले गेले पाहिजे.
7)सदरील हत्याकांड होण्यापूर्वी व झाल्यानंतर आरोपी व मुख्य सूत्रधार कोणाच्या घरी गेले.कट कुठे रचला गेला त्यांचे लोकेशन तपासण्यात येऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा मागण्या केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य अन्याय व अत्याचारग्रस्त म्हणून जाहिर करा: दिपक भाई केदार
सकल मातंग समाजाच्या या जन आक्रोश मोर्चाला रिपब्लिकन पँथर ओल इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी राज्याला अन्याय अत्याग्रस्त राज्य म्हणून घोषीत करण्याची मागणी केली. त्याच बरोबर कांबळे कुटुंबियांच्या बाजूने कायम सोबत राहून त्यांना बळ देण्याचे आश्वासन दिले. राज्यात बिघडत चाललेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून सांगोला तालुक्यांतील दलितांवरील होणारे अन्याय अत्याचार सहन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
लोकप्रतिनिधींनी पिडीत कुटुंबाकडे लक्ष द्यावे: प्रा सुकुमार कांबळे
कै. सुनील कांबळे यांची हत्या होवून दहा दिवस झाले पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कुटुंबाला भेट दिली नाही, हि गोष्ट फारच चिंताजनक आहे. येणाऱ्या काळात तरी त्यांनी पिडीत कुटुंबाला भेट देवून धीर द्यावा, त्यांना आधार द्यावा, असे आवाहन सुकुमार कांबळे यांनी केले. तसेच झालेल्या घटनेच्या बाबतीत त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
कांबळे कुटुंबाला यांनी दिली आर्थिक मदत
कै. सुनिल कांबळे यांच्या हत्येनंतर उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबाला अनेकांनी या वेळी आर्थिक मदत केली. यामध्ये रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष सुरज बनसोडे यांनी 25 हजार रोख दिले. प्रा सुकुमार कांबळे यांनी 10 हजाराची मदत केली. तर भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय (बापू) बनसोडे यांनी रोख पाच हजारांची मदत केली. या सर्वांनी सकल मातंग समाजाला पाठींबा देवून रोख रक्कम दिली.या सर्वांचे सकल मातंग समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.
सांगोला तालुक्यातील सर्व बहुजन संघटना, दलित संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या अनेक नेत्यांनी सकल मातंग समाजाच्या या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शविला.यावेळी सांगोला शहरातील व्यापार्यानी आपली दुकाने 100 टक्के बंद ठेवून सकल मातंग समाजाच्या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला.
सदर मोर्चाचे सूत्रसंचलन सकल मातंग समाजाचे मार्गदर्शक दामोदर साठे यांनी केले तर आभार विनोद रणदिवे यांनी मानले. यावेळी सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.