रक्षाबंधनाचा सण त्याला टपाल खात्याचे कोंदण

सांगोला :-महिलांनो, या रक्षाबंधनाला, तुम्ही तुमच्या प्रिय भावांना पोस्ट विभागाने तयार केलेल्या विशेष ‘राखी  पाकीटा’ मधून राख्या पाठवू शकता. भाऊ बहिणींमधील अतूट नाते साजरे करण्यासाठी ग्राहकांशी तितकेच अतूट विश्वासाचे नाते असलेल्या पोस्ट विभागाने तयार केलेले हे राखी पाकीट म्हणूनच
वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एका पाकिटाची किंमत 12/- रुपये आहे, या पाकीटासाठी दर्जेदार कागद वापरला आहे. डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळालेली राखी आणि ती देखील विश्वासार्ह टपाल विभागाकडून म्हणून तिचे महत्व जास्त ! जी राखी बहिणीने मोठ्या प्रेमाने खरेदी केली आणि तितक्याच काळजीपूर्वक टपाल विभागाच्या राखी पाकीटामधून पाठविली आहे तिचा आनंद अवर्णनीय त्यातून
प्रत्येक भावापर्यंत ती वेळेत पोहोचावी म्हणून टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राने विशेष योजना तयार केली आहे.

पुणे क्षेत्राच्या वतीने बोलताना पोस्ट मास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये म्हणाले की, “दर
वर्षी या राखी पाकिटांना प्रचंड मागणी असते. सन 2020-21 मध्ये सुमारे 35 हजार, सन 2021-22
मध्ये 50 हजार, सन 2022-23 मध्ये आणि सन 2023-24 मध्ये 70 हजार अशी राखी पाकिटांची
विक्रमी विक्री पुणे क्षेत्राच्या टपाल विभागाने केली आहे. ग्राहक त्यांच्या राखी स्पीड पोस्टा ने देखील
पाठवू शकतात त्यामुळे देशात तसेच परदेशातही राखी अतिशय जलद आणि वेळेवर पोहोचू शकेल.
पाकीटावर लिहिलेल्या ‘राखी’ या शब्दामुळे राखी पाकिटांचे सॉर्टिंग करणे सोपे जाते शिवाय वेळेत
राख्या पोहोचविण्यासाठी मुख्य टपाल कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या
आहेत आणि राखी पाकीट वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिस मध्ये सूचना देखील देण्यात
आल्या आहेत.”

“नागरिकांनी प्रत्येक पाकिटावर प्राप्तकर्त्याचा आणि प्रेषकाचा व्यवस्थित पत्ता, पिन कोड आणि मोबाईल
क्रमांक लिहावा तसेच टपाल कार्यालयातील पिन कोड असलेल्या पेटी मध्ये हे राखी पाकीट द्यावे”, असे
आवाहन करताना पोस्ट मास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी अजून अशी विशेष माहिती
सांगितली की भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला भेट देण्यासाठी म्हणून ‘माय स्टँप’ ची सुविधा
शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे, या अनोख्या भेटीमुळे रक्षाबंधन द्विगुणीत हर्षाने
साजरे होईल! माय स्टँप या योजनेअंतर्गत नागरिकांना आपल्या प्रिय व्यक्तीचे पोस्टाचे तिकीट छापून
घेता येते आणि ते देखील अगदी अत्यल्प किमतीमध्ये! शिवाय आपल्या बंधू भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री-
माझी लाडकी बहिण’ आणि ‘मुख्यमंत्री-माझा लाडका भाऊ’ या योजनेच्या अंतर्गत योजनेसाठी
आवश्यक असणारे आधार लिंक असलेले भारतीय टपाल विभागाचे बँक खाते उघडून देखील बंधू भगिनी
आपले प्रेम व्यक्त करू शकतात असेही ते म्हणाले.

पुणे क्षेत्रातील पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी टपाल खात्याच्या
या अतुलनीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करताना पोस्ट मास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये
यांनी नागरिकांना राखीपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button