ब्राईट फ्युचर आयआयटी अॅन्ड मेडिकल अकॅडमीमध्ये एम.एच.टी.सी.ई.टी बॅचचे उद्घाटन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला येथे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ब्राईट फ्युचर अकॅडमीमध्ये आय.आय टी अँड मेडिकल अकॅडमी मध्ये आज 12 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्ड व एम.एच.टी.सी.ई.टी बॅचचे उद्घाटन संपन्न झाले.
प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेस संस्था अध्यक्ष डॉ.पियुष साळुंखे-पाटील, संस्थासचिव अनिल येलपले व माजी उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब लिगाडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून औपचारिक रित्या या बॅचची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी स्टेट बोर्ड व एम.एच.टी.सी.ई.टी या बॅचसाठी मार्गदर्शन करणारे तज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.
नव्याने सुरू करत असलेल्या बॅचसाठी केमिस्ट्री विषयासाठी 30 वर्ष अध्यापनाचा अनुभव असणारे माजी उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब लिगाडे, माजी उपप्राचार्य प्रा.एन डी माने, प्रा.सौ.तेजस्विनी मेटकरी, भौतिकशास्त्र विषयासाठी 30 वर्ष अध्यापनाचा अनुभव असणारे मा.उपप्राचार्य प्रा.भीमराव राऊत, प्रा.सौ.ऋतुजा गायकवाड, जीवशास्त्र विषयासाठी 15 वर्ष अध्यापनाचा अनुभव असणारे प्रा. सचिन भिवरे , गणित विषयासाठी प्रा.राजीव कुमार हे सर्व शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बोलताना माजी उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब लिगाडे म्हणाले की, यश संपादन करायचे असेल तर स्वतः प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे, अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, त्याचप्रमाणे गुरुजनांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल असे सांगत पुढे त्यांनी जीवनामध्ये विद्यार्थी दशेत यशस्वी झालेल्या थोर व्यक्तींची उदाहरणे दिली. ही बॅच सुरू करण्यापाठीमागे सांगोला तालुक्यातील व परिसरातील विद्यार्थ्यांना अल्पदरामध्ये चांगले शिक्षण मिळावे या हेतूने ही बॅच सुरू करत असल्याचे सांगून आम्ही सर्वजण ज्ञानदानाचे श्रेष्ठ कार्य करत आहोत असे सांगितले.
यानंतर मार्गदर्शक शिक्षकांकडून प्रा.सौ.तेजस्विनी मेटकरी, प्रा.सचिन भिवरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलत असताना डॉ.पियुष साळुंखे-पाटील म्हणाले की, मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये सुरू केलेल्या इयत्ता नववी, दहावी फाउंडेशन बॅच व इयत्ता अकरावी नीट व जे.ई.ई बॅच अगदी चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या बॅचला मार्गदर्शन करणारे जीवशास्त्र विषयासाठी प्रा.कमलेशकुमार, गणित विषयासाठी प्रा.राजीव कुमार, भौतिकशास्त्र विषयासाठी प्रा.राकेश वर्मा, केमिस्ट्री विषयासाठी प्रा.विपिन कुमार गुप्ता यांनी उत्कृष्टपणे अध्यापन करून आपल्या सर्व मुलांची चांगली तयारी करून घेतलेली आहे असे सांगितले. आपल्या विद्यार्थ्यांनी अजून प्रयत्न करून चांगले गुण घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी काही समस्या असतील तर त्यांनी त्या मला सांगाव्यात, मी निश्चितपणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली.
त्याचबरोबर आज नव्याने सुरू करत असलेल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड व एम.एच.टी.सी.ई.टी या बॅच साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचा गुलापुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन घोंगडे सर यांनी तर आभार राठोड सर यांनी मानले.