*25 वर्षांनी सांगोला विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची भरली शाळा; प्रचंड उत्साहात स्नेहमेळावा साजरा*

 

वेळ सकाळी 9.30 वाजताची… सांगोला विद्यामंदिर प्रशाला,सांगोला मध्ये विद्यार्थ्यांची मोठी लगबग सुरू होती. एकामागून एक विद्यार्थी जमा होत होते. मात्र आज त्यांच्या पाठीवर दप्तर नव्हते… ना होमवर्क किंवा लेक्चरचे टेन्शन… युनिफॉर्मचेही टेन्शन नसल्याने प्रत्येकजण आपल्याला आवडत्या पेहरावात शाळेत हजर झाला होता.
चेहर्‍यावर फक्त आनंद ओसंडून वाहत होता… तो म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 25 वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा… सन 1999 च्या बॅचचे दहावी तुकडी ‘क’चे विद्यार्थी आणि त्यांना शिकविणारे शिक्षक तब्बल २५ वर्षांनी रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी एकत्र आले. गुरूजनांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर साजरा झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली.यानंतर दिवंगत विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यक्रम सुरू झाला. शाळा भरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरूजींची प्रार्थना विद्यार्थ्यांनी एका सुरात म्हटली. यावेळी विद्यार्थ्यानी स्वत:ची ओळख करून देत आपण शिक्षक, डॉक्टर,आरोग्य,खासगी व्यवसाय,खासगी कंपन्या, सरकारी क्षेत्र, पत्रकारिता, शेती अशा कार्यक्षेत्रात नाव कमावल्याचे सांगितले.याचा उपस्थित शिक्षकांनी गौरव करीत आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करा, यशस्वी व्हा, प्रकृतीची काळजी घेऊन सुखाने-आनंदाने जीवन जगा असा आशीर्वादही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना दिला.

 

दरम्यान,स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिली.तसेच उपस्थित गुरुजनांना प्रत्येकी भेटवस्तू व रोप देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी संस्था सचिव श्री.म.शं.घोंगडे, मुख्याध्यापक गं.ना. घोंगडे सर, उप मुख्याध्यापक लक्ष्मण विधाते सर,श्री संजीव नाकील सर,श्री भीमाशंकर पैलवान सर, श्री ना.म. विसापूरे सर,श्री अब्दुलगणी सय्यद सर,सौ वंदना महिमकर मॅडम,श्री.नारायण राऊत,श्री.दत्तात्रय देशमुख उपस्थित होते

*धम्माल, मस्ती, गप्पा आणि गाणी*

स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आठवण म्हणून शाळेचा लोगो,शाळेचा फोटो असलेला आकर्षक कॉफी मग व ग्रुपफोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आला.यानंतर वेळ होती धम्माल, मस्ती, गप्पा आणि गाणी अशा सांस्कृतिक रेलचेलीची. याशिवाय विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा आनंद लुटला. तब्बल २५ वर्षांनी एकत्र आल्यामुळे झालेला आनंद गगनात मावेनासा झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून अखेर पुन्हा लवकरच भेटण्याचा निश्चय करून निरोप घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत चैतन्य कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन अर्चना कटरे यांनी व आभार प्रदर्शन सुनील पुरंदरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button