जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

NPS/GPS ला विरोध करत हजारो कर्मचारी रविवारी रस्त्यावर उतरणार -तालुकाध्यक्ष महेश कसबे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने मागील १० वर्षांपासून सातत्याने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना नको असलेली DCPS योजना २००५ साली आणली नंतर २०१५ त्याचे रूपांतर २०१५ मध्ये NPS मध्ये केले. आता कर्मचाऱ्यांचा विरोध असताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याऐवजी सरकार NPS चेच नाव बदलून GPS योजना आणत आहे अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष महेश कसबे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी या नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात असून प्रत्येक जिल्ह्यात या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद सोलापूर या मार्गावर पेन्शन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाचे रुपांतर जिल्हा परिषद उपोषण गेट येथे धरणे आंदोलनात होणार आहे. पेन्शन आक्रोश मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागांतील हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. अनेक कर्मचारी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महसूल, सिव्हिल, वस्तू व सेवा कर , राज्य विमा हॉस्पिटल, आरोग्य, ग्रामसेवक, तलाठी, सांख्यिकी, उच्च व तंत्रशिक्षण, सोलापूर विद्यापीठ, आय टी आय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक व अन्य विभागातील कर्मचारी या पेन्शन आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहे, अशी माहिती सांगोला जुनी पेन्शन संघटनेचे सरचिटणीस धनाजी खंडागळे यांनी दिली.
सरकारने वेळीच दखल न घेतल्यास पुढील महिन्यापासून कामबंद आंदोलन करुन VOTE for OPS अभियान राबविण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हा प्रवक्ते श्री.कृष्णदेव पवार, जिल्हा संपर्कप्रमुख धनंजय धबधबे व जिल्हा महिला संघटक दिपाली स्वामी यांनी दिला आहे.