महाराष्ट्र
*ग्रामपंचायत पुरत्या मर्यादीत नेतृत्व असणाऱ्यांची पाणीपूजनासाठी धडपड- श्री.चंद्रकांत सरतापे*

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधव दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही बालिश पनासारखे वक्तव्य करून पाण्याच्या नावावर राजकारण करू नये. लोकप्रतिनिधींनी मंत्री महोदय यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली आणि ते त्यांचे कर्तव्यही आहे.त्यामुळे कुणाच्या पोटात दुखायचे काही कारण नसून ग्रामपंचायत पुरत्या मर्यादीत असणार्या नेत्यांची पाणीपूजनासाठी धडपड सुरू असून लोकप्रतिनिधींना आव्हान देणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार असल्याचे घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दीप्रमुख श्री.चंद्रकांत सरतापे यांनी केली
सांगोला तालुक्यातील पाण्यासाठी ज्या काही योजना अस्तित्वात आल्या त्या योजनांसाठी कोणी प्रयत्न केले हे सबंध महाराष्ट्रातील नेते मंडळी सह तालुक्यातील जनतेला सुद्धा कल्पना आहे. ज्यांनी या योजनांसाठी आयुष्यभर ज्यांनी प्रयत्न केले त्यांनीही कधी या योजना अस्तित्वात आल्यानंतर किंवा पाणी आल्यानंतर सुद्धा या योजनांचे श्रेय घेतले नाही. यापुढेही या योजनांसाठी किंवा पाण्यासाठी लोकप्रतिनिधी श्रेय घेणार नाहीत.
पाण्यासाठी मंत्र्यांना भेटणे हे सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांसंदर्भात मंत्र्यांना भेटणे हे जर फोटो सेशन असेल तर तुमच्या विचारांची किव येते.विशेष बाब म्हणजे टेंभू म्हैसाळ योजना कोणामुळे अस्तित्वात आली हे आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींनी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाहीरपणे नाव घेऊन टेंभू म्हैसाळ योजनेचे जनक कोण आहेत याची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळे ढगात गोळ्या मारण्यापेक्षा आपल्या नेत्यांना जाऊन पाण्याच्या योजना कोणामुळे अस्तित्वात आल्या याची चौकशी करावी.
आपल्या सोबत काम करणारे वरिष्ठ नेत्यांनी आबासाहेबांसोबत काम केले आहे. ज्या योजनांच्या वास्तव्यतेबाबत आपणास काही कल्पना नसताना केवळ नजिकच्या कालावधीत येणाऱ्या पाण्याच्या पाणी पूजण्यासाठी आपण जे काही बोलत आहात त्यामध्ये काय तथ्य आहे हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी असले कुटील उद्योग बंद करावेत. ग्रामपंचायत पर्यंत मर्यादित असणाऱ्या नेत्यांनी लोकप्रतिनिधींवर बोलणे म्हणजे उंटावरून शेळ्या राखणे असा प्रकार आहे.
राजकारण करताना काही मर्यादा असतात त्या मर्यादा सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. गावातील राजकारण करताना आपण ज्या पद्धतीने राजकारण केले आहे त्यामुळे स्वतःच्या गावात आपणास किती मानतात हे जनतेला माहित आहे. एकच पद दुसऱ्यांदा मिळण्यासाठी तत्वे, विचार सोडणाऱ्यांनी फोटोसेशनच्या गप्पा करू नयेत अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.
————————-
*फोटोत येण्यासाठी धडपड करणाऱ्यांनी फोटो सेशनच्या बाता करू नयेत..*
राज्यभरातील नेते जिल्हा व जिल्हा परिसरात आल्यानंतर नेत्यांच्या पुढे मागे करत भेटीसाठी धडपड करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असतो. नेत्याच्या गर्दीत कुठेतरी घुसखोरी करून मागे पुढे उभा राहून फोटोत येण्यासाठी धडपड करणाऱ्या नेत्यांनी फोटोसेशनच्या बाता मारू नयेत. आपण एका पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात त्यामुळे बालिशपणासारखे वक्तव्य करून आपण बालिश आहोत हे सिद्ध करू नयेत.
————————-