प्रतिकूलतेतून होतो यशाचा उदय -माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर

नाझरा (वार्ताहर): ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. ती गुणवत्ता ओळखून योग्य त्या पद्धतीचे मार्गदर्शन त्याला मिळाले तर निश्चितपणे तो यशाच्या शिखरावरती पोहोचतो. महाराष्ट्रात किंबहुना देशामध्ये अनेक मोठे अधिकारी हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होऊ शकतो. प्रतिकूलतेतून यशाचा उदय होतो असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालक ,सय्यदलायकअल्ली काझी, मुख्याध्यापक बिभीषण माने,पर्यवेक्षक विनायक पाटील, दिलीप सरगर,वसंत गोडसे प्रा. नारायण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्तायादीतील अनुष्का निंबाळकर,वेदांत धायगुडे, ओंकार पाटील, सार्थक घाडगे तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात तेरावा आलेला आदर्श बाबर व जिल्हा गुणवत्ता यादीतील सुशांत बाबर,मानसी आडसूळ, विराज राऊत, रामेश्वर बंदवडे, सुरज यादव, अलफाज काझी, वेदिका पाटील, मयूर शेळके, रोहित वलेकर,सृष्टी पोरे, ओम गोडसे, श्रेयसी बाबर,सानिका बंदवडे या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते पालकांसमवेत सन्मानित करण्यात आले. बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये हिंदी विषयात राज्यात प्रथम आलेली ऋतुजा चव्हाण व सहकार विषयात पुणे बोर्डात दुसरा क्रमांक आलेली साक्षी गायकवाड या विद्यार्थिनींना मार्गदर्शक शिक्षक प्रा. महेश विभुते यांच्याकडून वडील कै. नाथा विभुते व बंधू कै. अनिल विभुते यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये देऊन पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये गौरी खळगे, आदर्श बाबर, सुशांत बाबर अस्मिता पाटील,अनंत मिसाळ ऋषिकेश शितोळे, सोहम सासणे, स्नेहल बाबर व ओम गुरव यांना दिलावर नदाफ यांच्याकडून स्मृतीभेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेतील ऐश्वर्या पांढरे, किशोरी बाबर,ज्ञानदा केंगार,विशाखा वाघमारे व अनंत मिसाळ या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सोमनाथ सपाटे यांच्याकडून पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक महादेव निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत शाळेने राबवलेल्या स्पर्धा परीक्षेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना माजी कुलगुरू डॉ. बंडगर म्हणाले की, आपल्या आयुष्यात आलेली संधी ओळखता आली पाहिजे. आपल्या यशाच्या पाठीमागे अनेकांची मेहनत असते ही मेहनत नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. शाळेबद्दलची कृतज्ञता आणि गुरु बद्दलचा आदर हा यशस्वी जीवनाचा मंत्र आहे.संगत चांगली असेल तर आपल्या आयुष्याचे सोने होते. अशा प्रकारचे विचार व्यक्त करत स्वतःच्या जीवनातील विविध अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेने दहावी,बारावी, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा अशा विविध बाह्य परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल पालकांच्या वतीने महादेव निंबाळकर यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन मुख्याध्यापक बिभिषन माने यांना सन्मानित केले. स्पर्धा परीक्षेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक विनायक पाटील यांनी मानले.



