लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला ( प्रतिनिधी): जगात वेगवेगळ्या पद्धतीने राज्यक्रांती झाली आहे. बंदुकीच्या नळीच्या जोरावर क्रांती घडली आहे, लोकशाही च्यार आंदोलनातून क्रांती घडली आहे. परंतू, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विचारातून आणि लिखाणातून सामाजिक क्रांती केली. त्यांच्या विचारांचा धागा पिढ्यानपिढ्या तेवत राहिला आहे. परखड लिखाणातून रंजलेल्या, गंजलेल्या, पिचलेल्या, वंचितांची आर्त हाक प्रस्थापितांच्या कानावर आदळावी आणि वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिम्मित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन आपल्या प्रखर लेखणीच्या माध्यमातून चित्रित करुन लेखणी अहोरात्र झिजवली. ते आपल्या लेखणीतून सातत्याने दलित, वंचित, पीडित, उपेक्षित, बहिष्कृत आणि अन्यायग्रस्त माणसांची व्यथा-वेदना मांडत राहिले. स्वातंत्र्य, समता, न्याय, आत्मसन्मान आणि आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे, बंडखोरी करणारे, धाडसी, करारी, शूरवीर आणि स्वाभिमानी नायक त्यांनी रेखाटले. साहित्यातून समाज प्रबोधन आणि त्यातून समाज परिवर्तन हेच त्यांच्या साहित्याचे सूत्र होते. अण्णाभाऊंचं साहित्य क्षेत्रातील योगदान आणि शोषितांसाठी त्यांनी समर्पित केलेलं आयुष्य याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, असे मत मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

 

यावेळी दामोदर साठे, विनोद रणदिवे, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, सागर पाटील, गुंडादादा खटकाळे, अमित साठे, सचिन रणदिवे, भिवा भोसले, बाळासाहेब रणदिवे, महादेव कांबळे यांच्यासह आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अन्य मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button