महाराष्ट्र
विविध उपक्रमांनी नाझरा विद्यामंदिर मध्ये साने गुरुजी जयंती साजरी

नाझरा(वार्ताहार):- खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे अशा प्रकारची रचना करून संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे थोर देशभक्त साने गुरुजी यांच्या कार्याचा आदर्श आपल्या जगण्यात उतरायला हवा. आज त्यांची 125 वी जयंती साजरी होत असताना त्यांच्या विविध प्रकारच्या साहित्यकृतीतून ते आजही समाजामध्ये जिवंत आहेत.अतिशय शांत व प्रेमळ स्वभावातून त्यांनी माणूस जोडण्याचे काम केले.साने गुरुजींचे विचार नुसते वाचनात न आणता आपण ते आचरणातून जपूया असे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज साने गुरुजी कथामाला विभागाचे प्रमुख सोमनाथ सपाटे यांनी केले.
प्रशालेत आयोजित केलेल्या साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सानिका संजय पाटील, मुक्ताई दादासो निंबाळकर,दुर्गेश्वरी आशिष सोनवणे व संभाजी सरगर यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना विद्यार्थ्यांसमोर सादर केली. सोलापूर येथील साने गुरुजी कथामालेच्या वतीने तेजल यशवंत गडदे या विद्यार्थिनीस रोख पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तेजल गडदे हिचा सत्कार करण्यात आला.दुपारच्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी नानासो पिसे यांचे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान संपन्न झाले. समाजात असणारी अंधश्रद्धा आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार महालिंग पाटील यांनी मानले.