महाप्रबोधन यात्रेमुळे भाजपसह गद्दार आमदारांना घाम फुटत आहे- सुषमाताई अंधारे

सांगोला (प्रतिनिधी):-50 खोक्यामुळे गद्दारांची नियत बदलली आहे. हे लोक हिंदुत्ववादी व निधीसाठी गेले नसून हे लोक स्वत:साठी गेले आहेत. महाप्रबोधन यात्रेचे लीड महिला करत आहेत तरीदेखील महाप्रबोधन यात्रेमुळे भाजपसह गद्दारांना घाम फुटत आहे.लोकांना शहाणे करण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढली आहे. शिवसेनेने कधीही सत्तेचा विचार केला नसून कायम संघर्ष केला आहे. शिवसेनेस संघर्षही नवीन नाही त्यामुळे शिवसेना आजही अभेद आहे. आजही आमच्यासोबत निष्ठावान माणसे आहेत त्यामुळे येणार्या काळातही शिवसेना लढत राहणार असून शिवसेना कधीही थांबणार नाही असे विचार शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी व्यक्त केले.
राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेऊन प्रकाश झोतात आलेल्या शिवसेना उपनेत्या व सेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख निर्माण केलेल्या सुषमाताई अंधारे या काल रविवार दि. 25 डिसेंबर रोजी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सांगोला तालुक्याच्या दौर्यावर आल्या होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अनिल कोकीळ, संजनाताई घाडी, प्रा.लक्ष्मण हाके, साईनाथ अंभगराव, शरद कोळी,उत्तम ऐवळे, पूनमताई अंभगराव, गणेश इंगळे, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब यांच्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महिला बघिनींकडून सुषमाताई अंधारे यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना सुषमाताई अंधारे म्हणाल्या, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यामातून आतापर्यंत 33 प्रत्येक मतदार संघात जावून गद्दार आमदारांना शांत, संयमी व अत्यंत संसदीय भाषेत प्रश्न विचारले परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मला कसे अडकवता येईल का यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माझ्यावर काही बोलायला नाही म्हणून 13 वर्षांपूवीच्या व्हिडीओमधील मागील पुढील संदर्भ कट करुन दाखवून मला अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येणार्या निवडणुकीत महापुरुषांचे अपमान करणार्यांना धडा शिकवला गेला पाहिजे. महापुरुषांचा अवमान करणार्यांना पदावरुन पायउतार केल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचा इशारा देत एकनाथ शिंदे यांचा भाजपकडून कधी गेम होईल हे त्यांना कळणारही नाही, असा दावाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सभेच्या सुरवातीस कोरोना काळातील अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या लोकाभिमुख कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर रविशंकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले लिखाण, भिडे गुरुजींची बातमी, निवृत्ती महाराजांचे व इतरांचे प्रवचने तसेच पंतप्रधान मोदी व इतर भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाचे सभेमध्ये व्हिडिओच दाखविण्यात आले.
यावेळी सुषमाताई अंधारे यांनी सोलापूर जिल्हयासह सांगोला तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांकडून करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, तुषार इंगळे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन जितेश कोळी यांनी तर प्रास्ताविक संभाजीराव शिंदे यांनी तर आभार नवल गाडे यांनी मानले.जाहीर सभेसाठी शंकर मेटकरी, रघुनाथ गायकवाड, सुभाष भोसले, सौरभ चव्हाण, योगेश जोंदळे, गोपाल म्हेत्रे, प्रभू स्वामी, प्रकाश गायकवाड, संतोष वसमळे, सचिन सुरवसे, संतोष येडगे, अक्षय रुपनर यांच्यासह कार्यकर्ते, महिला बघिनी, युवा सैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
दादा लाव रे व्हिडिओ, आज धुरळाच काढते..
तेरा वर्षांपूर्वीचा 14 सेकंदाचा व्हिडिओ काढून माझी प्रतीकात्मक तिरडी बांधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आजवर याविषयी अनेकांनी अक्षपार्ह विधाने केली त्याबद्दल भाजप काहीच कसे बोलत नाही. याबाबत सुषमा अंधारे यांनी सभेमध्ये अनेक व्हिडिओच दाखवले.