शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचेकडून महाप्रबोधन यात्रेत स्व.गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोल्यात मी काय पहिल्यादा आले नाही. स्व.आबासाहेबांसोबत तासन तास गप्पा मारण्याचे सानिध्य मला लाभले आहे. सांगोला तालुक्यात टेंभू-म्हैसाळ योजनेचे पाणी आबासाहेबांनी आणले त्यासाठी त्याकाळातील सर्व प्रयत्न आबासाहेबांनी केले आहेत. सांगोल्यातील डाळिंब जगभरात निर्यात करण्याची किमया आदरणीय आबासाहेबांनी केली त्यामुळे आदरणीय आबासाहेब हे सांगोल्याचे दैवत आहेत, अशा शब्दात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी स्व.गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे काल रविवार दि.25 डिसेंबर रोजी सांगोल्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत सुषमाताई अंधारे यांनी गद्दार आमदारांचा समाचार घेत स्व. देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेत गौरव केला.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, आदरणीय आबासाहेब सांगोला मतदार संघातून 11 वेळा आमदार झाले. त्या आबासाहेबांनी काहीच प्रॉपटी जमा केली नाही असे सांगत सांगोला मतदार संघात टक्केवारीचे राजकारण कुणालाही माहित नव्हते. आबासाहेब असताना इथे कधी अधिकार्यांवर कुठलाही दबाब नव्हता. परंतु आता सध्याचे चित्र वेगळे दिसत आहे. 1995 चा विधानसभेचा विजय त्यावेळेच्या विद्यमान आमदारांना सहानभुतीच्या लाटेमुळे नशिबी आला. अन्यथा सांगोल्यात आदरणीय आबासाहेबांच्या शिवाय पर्याय नव्हता. 2019 साली आदरणीय आबासाहेब 92 वर्षाचे झाले होते. स्व.आबासाहेबांनी त्यामुळे स्वत: उमेदवारी नाकारली. त्यावेळी पक्षाकडून भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी दिली गेली. परंतू रुपनर यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यावेळी जनतेने अनिकेत यांचे नाव सूचविले तेव्हा आबासाहेब स्वत: म्हणाले होते, अनिकेत नवीन आहे अनिकेतला कळणार नाही. परंतु लोकांनी आग्रह केल्यामुळे अनिकेतला आदरणीय आबासाहेबांनी उमेदवारी दिली. त्यावेळी पुन्हा अनिकेत देशमुख आमदार झाले तर आबासाहेबांसारखे पुन्हा ते 40-45 वर्षे बसतील का ही भीती ज्यांना ज्यांना वाटत होती त्या सर्व स्वार्थी लोकांनी आ.शहाजीबापू पाटील यांना साथ दिली. सर्वांनी साथ देवून सुध्दा अवघ्या 768 मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत आ.शहाजीबापू पाटील यांची विकेट पडणार असल्याचे शेवटी सुषमाताई अंधारे यांनी सांगितले.
सुषमाताई अंधारे यांचे अगोदर ना.नितीन गडकरी यांनीसुध्दा टेंभू-म्हैसाळ योजनेसाठी स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी संघर्ष केला असल्याचे सांगितले होते. सुषमाताई अंधारे यांनी स्व.गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केल्यामुळे दिवसभर सांगोला शहरात राजकीय चर्चांना उधान मिळाले.