शेकापच्या अस्तित्वाची चिंता ..

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काळात शेतकरी आणि कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या संघटनेने रक्ताचे पाणी केले,त्या शेतकरी कामगार पक्षाने शुक्रवारी 77 व्या वर्षात पदार्पण केले.पंढरीत यानिमित्ताने शेकापचे अधिवेशनही भरवण्यात आले आहे.पक्षाच्या भवितव्यावर यात आत्मचिंतन होईलच शिवाय राज्यात आज शेकापची काय स्थिती आहे,यावरही चर्चा होताना दिसत आहे.

एकेकाळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला शेकाप आज रसातळाला गेला आहे,अशी खंत जुन्या पिढीतील नेत्यांमधून व्यक्त केली जात आहे. पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पक्षातील जुने जाणते नेते पक्ष सोडून गेले. नवीन पिढीला पक्षाचे आकर्षण राहिलेले नाही. पक्षाने काळानुरूप होणारे बदल पक्षाने स्वीकारलेले नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पुढील वाटचाल आव्हानात्मक असणार आहे,असे राजकीय जाणकार सांगतात.

राज्यात 2 ऑगस्ट 1947 रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. काँग्रेस मधील असंतुष्ट नेत्यांनी एकत्र येऊन या पक्षाची स्थापना केली. या घटनेला शुक्रवारी 77 वर्ष पूर्ण झाली. या कार्यकाळात पक्षाने अनेक चढ उतार पहिले. कष्टकरी, शेतकरी आणि कामगाराचे प्रश्न मांडण्याचे काम या काळात पक्षाने केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही पक्षाचे अनेक नेते सक्रीय होते. त्यामुळे पक्षाचा जनाधार आणि विस्तारही वाढत गेला. ना. ना. पाटील, माधवराव बागल, सोलापूरचे देशभक्त तुळशीदास जाधव, एन .डी. पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील, दि. बा पाटील, प्रभाकर पाटील या सारखे मात्तब्बर नेते पक्षात होते.

राज्याचे विरोधी पक्षनेते पदही पक्षाकडे होते. राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी शेकापच्या एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, मोहन पाटील, मिनाक्षी पाटील यांना मिळाली होती. पण गेल्या तीन दशकात पक्षाला उतरती कळा लागली आहे. पक्षाचा जनाधार घटला आहे. त्यामुळे पक्षाला एक एक आमदार निवडून आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत याचीच प्रचिती आली. शेकापचा बालेकिल्ला असणार्‍या रायगड जिल्ह्यातून पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. गणपतराव देखमुख यांच्या सांगोला या मतदारसंघातून पक्षाचे  उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांचा  पराभव झाला. मराठवाड्यातील लोहा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी असलेले शामसुंदर शिंदे हे पक्षाचे एकमेव आमदार निवडून आले. मात्र ते नावाचे शेकापचे आमदार राहिले. त्यांनी थेट भाजपला समर्थन दिले. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा विधान परिषदेत झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे.

शेकाप राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जयंत पाटील यांचे विधान परिषदेत असणे महत्वाचे होते. पण काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि इतर मित्र पक्षांनी अखेरच्या क्षणी साथ सोडल्याने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे राजकीय अस्तित्वही धोक्यात आले. याचे दूरगामी परिणाम आगामी काळात पहायला मिळतील,यात शंकाच नाही. एकेकाळी रायगड हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पक्षाचे चार ते पाच आमदार जिल्ह्यातून निवडून जायचे, पक्ष कार्यकर्त्यांचे भक्कम केडर संघटनेच्या पाठीशी होते. पण आता गेले ते नेते आणि राहिल्या नुसत्या आठवणी असे म्हणण्याची वेळ पक्षकार्यकर्त्यांवर आली आहे.

रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची साथ सोडल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात पक्षाची वाताहत सुरू झाली. विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळ्यात अडकल्याने, उरण मध्ये पक्षाला उतरती कळा लागली. पेण विधानसभा मतदारसंघातून तरुण तडफदार नेते , अशी ओळख असलेल्या माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे या मतदारसंघातही पक्षाची वाताहत झाली. अलिबाग विधानसभा मतदारसंघातही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. मुरुड मधून मनोज भगत, अलिबाग मधून दिलीप भोईर पक्षाला सोडून गेले.

आता अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीवरून माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यातील मतभेद पेझारी येथे झालेल्या कार्यकर्त्याा मेळाव्याच्या निमित्ताने समोर आले आहेत. आस्वाद पाटील हेच आपले राजकीय वारसदार असल्याचे माजी आमदार सुभाष पाटील यांनी जाहीर केले आहे. तर जयंत पाटील हे त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पक्षातील विसंवाद कायम राहीला तर या मतदार संघातील अस्तित्व अडचणीत येण्याची शक्यता आहे. आधीच रायगड जिल्ह्यावरील शेकापची पकड सैल झाली आहे. काळानुरूप बदलत्या राजकारणाला पक्ष स्वीकारायला तयार नाही. जुन्या नेत्यांचे राजकारण संपत आले आहे आणि तरुण लोक पक्षात येण्यास फारसे उत्सुक राहिलेले नाहीत. त्यामुळे पक्षाची वाटचाल अधिकच खडतर होत चालली आहे. त्यामुळे पक्षाची पुर्नबांधणी करणे हे पक्षा समोरील सर्वात नोठे आव्हान आहे.

आजवर जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका शेकापने घेतली आहे. त्यामुळे विकासाला विरोध करणारा पक्ष अशी प्रतिमा पक्षाची तयार झाली आहे. ही जनमानसातील ही प्रतिमा मोडून काढणे पक्षासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहे. ज्या शेतकरी कामगारच्या हक्कांसाठी पक्षाची स्थापना झाली. त्यांच्या प्रश्नांची कास शेकापला आगामी काळात धरावी लागणार आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरूच ठेवले तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून पक्षाचे अस्तित्व संपूष्टात यायला वेळ लागणार नाही.जुन्या नेत्यांनी तरूणांची नवी फळी तयार केली नाही ही शेकाची खरी शोकांतिका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button