भिमा, सिना व माण नदीवर मोठे बंधारे (बॅरेजेस) बांधून पाणी अडविल्यास पंचवीस टीएमसी पाण्याची बचत होणार असून यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून याविषयी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.
मुंबई येथे प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्नाबाबत निवेदन दिले.
भीमा, सीना व माण नदीवर विविध ठिकाणी मोठे बंधारे अर्थात बॅरेजेस बांधल्यास पुराचे वाहून जाणारे पाणी अडविले जाणार असून याचा मोठा फायदा जिल्ह्याला होणार आहे. याबाबत परिचारक यांनी गेल्या काही वर्षापासून वारंवार शासनाकडे मागणी लावून धरली आहे. मात्र याचा मोठा खर्च असल्यामुळे याबाबत शासन सकारात्मक असूनही कार्यवाही होत नाही. यावर परिचारक यांनी शासनास सध्या भीमा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याचे रूपांतरच मोठ्या बॅरेजेसमध्ये करणे शक्य आहे का यावर चर्चा केली.
उजनी धरणाच्या खाली मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारे पाणी तसेच वीर धरणातून वाहून जाणारे पाणी भिमा नदीच्या माध्यमातून कर्नाटक मध्ये जाते याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उपयोग होत नाही. सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी भिमा नदीतून पाणी सोडले जाते. भविष्यकाळात सोलापूर दुहेरी पाईपलाईन कार्यान्वित झाल्यास भिमा नदीकाठ पुर्णपणे कोरडा/ओसाड होणार आहे. साखर कारखाने, फळ बागा व अन्य शेती विषयी उद्योगासाठी अनेक नागरिकांनी कोट्यावधी रूपये इन्वेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे ते भविष्यात अडचणीमध्ये येणार आहेत. व आत्तापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.
सोलापूर लोकसभेच्या निवडणूक वेळी याविषयी जिल्ह्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भिमा नदीवर बॅरेजेस बांधणेबाबत मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती.
भिमा, सीना व माण नदीवर छोटे छोटे बंधारे आहेत. परंतू पावसाळ्यात या बंधाऱ्याचे दरवाजे काढले जातात. पर्यायी वाहून जाणाऱ्या पाण्याचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नाही. भिमा, सीना व माण नदीवरती 1 टिएमसी पाणी साठवण क्षमतेचे स्वंयचलित बॅरेजेस बांधले तर त्या पाण्याचा डिसेंबर पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील भिमा, सिना, माण नदी काठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून वाहून जाणारे पावसाचे पाणी अंदाजे 15 ते 20 टिएमसी पाणी नदीपात्रामध्ये उपलब्ध होईल.
दरवर्षी पावसाळ्यात अंदाजे 20 ते 30 टीएमसी इतके पाणी हे कर्नाटकात वाहून जाते. वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी नियोजन केल्यास डिसेंबर पर्यंत उजनीवरती ताण येणार नाही. व उजनीतले पाणी शिल्लक राहील. याचा वापर रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी करता येईल. उजनी धरणावरती येणारा अतिरिक्त पाण्याचा ताण कमी होईल. यासाठी अंदाजे 25 टीएमसी पाणी अडविण्याचे एकलाँग टर्म प्लॅन बनवून या कामाला गती दिल्यास पुढील काळातील अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल.
भिमा, सिना व माण नदीवर बॅरेजेस बांधल्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून याचा मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार होईल व भविष्यातील पाण्याची अडचण दूर होईल.