पंढरपूर-मंगळेवढ्यातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी जाहीर

सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन निष्ठावंत शिलेदारांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईच्या शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.भाजप आमदाराच्या मतदारसंघात धोत्रे यांच्या रुपाने पहिला उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी भाजपच्या विरोधात शड्डू ठोकल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन दिवसांच्या सोलापूर दौर्यावर आहेत. सोलापुरातील मान्यवरांशी रविवारी सायंकाळी चर्चा केल्यानंतर आज सकाळपासून ते जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या ते पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा करत आहेत. या आढावा बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील किती मतदारसंघात मनसे निवडणूक लढवणार, हे जाहीर निश्चित होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मतदारसंघाचा आढावा घेत असतानाच राज यांनी दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दिलीप धोत्रे यांच्याकडे नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. तसेच, पक्षसंघटना वाढीसाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी त्यावेळी दिलीप धोत्रे यांच्यावर मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती. याशिवाय दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसे सहकार आघाडीच्या प्रमुखपदही देण्यात आलेले आहे.
————————————————–
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. राज ठाकरेंसोबत मी गेली 33 वर्षे काम करतो आहे आणि राजसाहेबांनी त्याचीच मला उमेदवारीच्या माध्यमातून पोचपावती दिली आहे, अशा शब्दांत पंढरपूरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीप धोत्रे यांनी प्रतिक्रिया दिली. मनसेकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अतिशय आनंद झाला आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी राज ठाकरेंचे आभार मानतो. त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलेला आहे. राजसाहेबांच्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, असेही दिलीप धोत्रे यांनी नमूद केले. अडचणीच्या काळात कुठला पक्ष, कुठला नेता जनतेच्या मदतीसाठी धावून गेला आहे. हे सर्व त्या मतदारांना आणि जनतेला माहिती आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार पंढरपूर-मंगळवेढ्यातून निश्चितपणे विजयी होईल, असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.