दोन दिवसात माण नदीत पाणी सोडण्यात येणार- डॉ.बाबासाहेब देशमुख
पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):-संपुर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती तयार झाली असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेतून ओव्हरफ्लोचे पाणी दोन दिवसात माण नदी सोडण्यात येणार असल्याची माहिती शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
विस्तारीत टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह सिंचन भवनमधील अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राज्यात पुरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना त्वरीत सुरु करुन ओव्हरफ्लोचे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडावे, अशी आग्रही मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी लावून धरली होती.
डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या आग्रही मागणीमुळे टेंभू ओव्हरफ्लोचे पाणी एक दोन दिवसात दुष्काळी भागात सोडण्यात येणार असल्यामुळे माण नदीत पाणी येणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत. पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
तसेच राज्यामध्ये जुनोनी येथील पाणीवापर संस्थेचा नावलौकीक आहे. प्रत्येक मोटारीला मीटर असताना व वेळेवर पाणी पट्टी भरली जात असताना सुध्दा कालवे फोडले म्हणून जुनोनी भागात राजकीय दबावापोटी चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावेळी संबंधित गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन अधिकार्यांकडून देण्यात आले.
त्याचप्रमाणे तसेच उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सद्य परिस्थितीत 100 टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून पंढरपूर तालुक्यातील उपरी, भंडीशेगाव, पळशी, सुपली, वाडीकुरोली, शेळवे, केसकरवाडी, बंधारे व साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरुन मिळावेत, त्याचप्रमाणे सोनके तलाव सुद्धा भरून देण्याची मागणी यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्यास संबंधित अधिकार्यांकडून होकार मिळाला असल्यामुळे उपरी, भंडीशेगाव, पळशी, सुपली, वाडीकुरोली, शेळवे, केसकरवाडी, बंधारा व सोनके तलाव लवकरच भरुन देण्यात येणार असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
विस्तारीत टेंभू योजनेमध्ये बुध्देहाळ, चोपडी, हातीद, पाचेगाव (खु), सोमेवाडी, बंडगरवाडी, अजनाळे/लिगाडेवाडी, चिणके (अंशत):, खवासपूर, लोटेवाडी(जुनी व नवी), मंगेवाडी (अंशत), सोनलवाडी, वझरे, डोंगरगाव, हणमंतगाव, हटकर मंगेवाडी, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणाप्पावाडी आदी गावांचा समावेश करुन या गावातील सिंचन योजनांची कामे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
या बैठकीस अभयसिंह जगताप, बाबूराव गायकवाड, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, अरविंद पाटील, महेश नलवडे, हरिभाऊ पाटील, नारायण पाटील, अॅड.विशालदीप बाबर, दादा शिनगारे, गजेंद्र कोळेकर, रणजितसिंह देशमुख, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सुरेंद्र गुदगे, कविताताई म्हेत्रे, मनोज पोळ,सुभाष नरळे, मुख्य अभियंता श्री.गुणाले, कार्यकारी अभियंता श्री.राजन रेडीय्यार,श्री रासनकर,श्री.हरगुडे व लाभक्षेत्रातील प्रमुख नेतेमंडळी,नागरिक उपस्थित होते.
—————————————————-
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही इतर लोक दबावाचे राजकारण करतील त्या बळी पडून मनमानी पद्धतीने पाणी सोडू नये तसेच पाणी बंद करून नये. शेतकर्यांचा विचार करून पाणी वाटपाचे वर्षिक नियोजन करावे, अशी देखील सुचना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली .