13 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषणाचे लोणारी समाजाकडून प्रशासनास निवेदन

लोणारी समाज सेवा संघ सांगोला यांच्यावतीने सांगोला शहरात लोणारी समाजरत्न विष्णुपंत दादरे साहेब यांचे स्मारक व्हावे याकरिता गेली अनेक वर्ष लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा व मागणी केली जात आहे वास्तविक पाहता सांगोला तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक लोणारी समाज एकवटलेला आहे.
सांगोला तालुक्याचा विचार करता सुमारे 60 हजार इतकी लोक वस्ती या समाजाची सांगोला तालुक्यात आहे• क्षारपड जमिनीतून मीठ,चुनखड का पासून चुना व जंगली लाकडांपासून लोणारी कोळसा बनवून हा समाज आपली उपजीविका भागवत होता.परंतु सिमेंटचे युग व सागरी मिठाच्या अतिक्रमणामुळे या समाजाचा पारंपरिक व्यवसाय नष्ट झाला. त्यामुळे हा समाज देशोधडीला लागला अशा या विखुरलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे काम लोणारी समाज रत्नपितामह विष्णुपंत दादरे साहेब यांनी केले व या समाजास सरकार दरबारी प्रयत्न करून इतर मागास प्रवर्गामध्ये नोंद करून घेतले त्यामुळे विष्णुपंत दादरे हे लोणारी समाजाचे मसीहा म्हणून पुढे आले अशा या वंदनीय व्यक्तिमत्त्वाचे भव्य आणि दिव्य स्मारक सांगोला शहरांमध्ये व्हावे याकरिता या समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे अनेक वेळा मागण्या केल्या परंतु या समाजाच्या या मागण्यास शासन व प्रशासन या दोन्हीही घटकांनी नेहमीच बेदखल केले
अत्यंत अहिंसक व सनदशीर मार्गाने हा समाज वारंवार आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करीत असताना सुद्धा व या समाजाच्या अस्मितेचा व अस्तित्वाचा लढा असताना सुद्धा या मागणीस जाणीवपूर्वक विलंब व टाळाटाळ होत असल्यामुळे हा समाज आता सनदशीर मार्गाने आता आपला लढा तीव्र करीत असून जोपर्यंत या समाजाच्या मागण्यांचा विचार केला जात नाही व समाज रत्नपितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारक सांगोला शहरात होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाची नोटीस लोणारी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार सांगोला, मुख्याधिकारी नगरपरिषद,सांगोला,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सांगोला यांना तसे निवेदन दिले असून दिनांक 13 ऑगस्ट 2024 पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर लोणारी समाजाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण केले जाणार आहे याकरिता गेले दोन महिने सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये लोणारी समाजाच्या वतीने गाव भेट दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते• या गाव भेट दौऱ्याला संपूर्ण तालुक्यातील लोणारी समाज बांधवांकडून उस्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद मिळत होता• त्यामुळे सांगोला शहरांमध्ये होणारे लोणारी समाजाचे हे आमरण उपोषण शासन व प्रशासनास निश्चितपणे धडकी भरविल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे •
याच मागणी बरोबर सांगोला नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या आरक्षित जागेपैकी पाच गुंठे जागा लोणारी समाज भवन उभारण्याकरिता उपलब्ध करून देण्याची ही मागणी या समाजाच्या वतीने करण्यात आली आहे •तसेच समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे साहेब आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये स्थापन करावे अशी ही मागणी या समाजाच्या वतीने आपल्या निवेदनात केलेली आहे पुणे व मुंबई या ठिकाणी शिक्षणाकरता गेलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता सुसज्ज व सर्व सोयी सुविधा युक्त असे वस्तीग्रह व प्रशस्त अभ्यासिका उभा करण्यात यावी अशी ही मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे• येत्या एक-दोन दिवसात प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न आल्यास 13 ऑगस्ट 2024 पासून लोणारी समाजसेवा संघाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्वाणीचा इशारा लोणारी समाजसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार हटणार नाही असा निर्धार ही लोणारी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे अशी माहिती लोणारी समाज सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संतोष करांडे यांनी दिली.