शेकाप पदाधिकारी निवडीवरुन माजी आमदार पंडित पाटील यांनी भर सभेतच पक्ष नेत्यांना सुनावल्याची बातमी रायगडात धडकली आणि रायगडच्या राजकारणात वेगळीच चर्चा रंगली. शेकापचे अधिवेशन पंढरपूर येथे पार पडले. पेणच्या अतुल म्हात्रे यांची सदस्य म्हणून निवड झाली आणि पंडित पाटील यांचा संयम सुटला. त्यांनी भर सभेत शेकाप नेते जयंत पाटील आणि बाळाराम पाटील यांना जाब विचारला. आता खडाजंगी होते की काय, असा बाका प्रसंग निर्माण झाला होता.
“मी लोकांनी निवडून दिलेला आमदार होतो. पक्षासाठी आमचेदेखील योगदान आहे. त्यामुळे कोणी दादागिरी करु नये”, असे त्यांनी भर सभेत सुनवायला सुरुवात केली. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पंडित पाटील यांनी आपले बोलणे सुरुच ठेवले. नवीन पदाधिकार्यांचे अभिनंदन त्यांनी केले, परंतु पक्षात प्रवेश करण्याआधी पदाधिकारी म्हणून कार्यकारिणीवर घेतल्यामुळे पंडित पाटील नाराज झाले. “लहानपासून मी पक्षाचे काम केले आहे, माझे नाव पंडितशेठ आहे. मी कोणाच्या अधिकारावर गदा आणणारा नाही आणि माझ्यावर कोणी आणत असेल तर ते पण खपवून घेणार नाही. मी जनतेचा सेवक आहे. तब्येत बरी नसतानाही याठिकाणी उपस्थित आहे. असे असताना तुम्ही बोलायची, माझे मनोगत व्यक्त करण्याचीही संधी दिली नाहीत. त्यामुळे नाईलाजाने मला विचार मांडावे लागले”, असे ते म्हणाले.
“शेकापक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पडली. जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केले. पण जे निवडणूक लढवत नाहीत, ते आम्हाला शहाणपणा शिकवतात. ही पद्धत पक्षात होता कामा नये, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा आदर ठेवला पाहिजे” असे पंडित पाटील यांनी सांगितले. अशाप्रकारे मध्येच उठून बोलल्यामुळे दिलगिरीही व्यक्त केली. दरम्यान, पंडित पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे व्यासपीठावरील नेते काही क्षणासाठी भांबावून गेले. तर समोर उपस्थित कार्यकर्ते घाबरुन गेले. आता काय होणार? असा प्रश्न त्या क्षणापुरता कार्यकर्त्यांच्या मनात आला. मात्र पंडित पाटील यांनी भाषण आटोपले आणि सर्वांनीच निःश्वास टाकला.
Back to top button