सांगोला ( प्रतिनिधी): पशुखाद्य तयार करण्यासाठी कमी दरात ६० टन मका खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील दोघांनी मिळून पशुखाद्य व्यावसायिकाची १४ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लक्ष्मण मारुती कोळेकर रा. भोपसेवाडी, ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित सक्सेना रा. शिखलाप, बरेली, उत्तर प्रदेश व अभिषेक गर्ग रा. बिसोरली, मेरठ, उत्तर प्रदेश या दोघांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोपसेवाडी, ता. सांगोला येथील लक्ष्मण मारुती कोळेकर यांचा सार्थक अग्रो वेट नावाचे पशुखाद्य तयार करण्याचा व्यवसाय असून मका भरडा तयार करून तो दुध उत्पादक शेतकऱ्यांना विक्री करीत असतात. लक्ष्मण कोळेकर यांनी शेतीमालाचे बाजारभाव व विक्रीबाबत माहितीसाठी मोबाईलमध्ये कमोडिटी ऑनलाईन ॲप डाऊनलोड केले होते. सदर अँपमधून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण कोळेकर यांनी अमित सक्सेना यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मका बाबत चौकशी केली. त्यावेळी सक्सेना याने २०५० रुपये क्विटल दराने मका देतो असे सांगितले. कोळेकर यांनी खात्री करण्यासाठी त्यांचा मित्र मेहरबान गुलबहार, रा. सहारनपुर, उत्तर प्रदेश यास त्या ठिकाणी पाठवले. अमित सक्सेना याने अभिषेक गर्ग व मेहरबान गुलबहार यास घेवून मेरठ बिसोरली मार्केट येथे जावून मक्याचे फोटो व्हाटसअपद्वारे पाठविले.
त्यानंतर लक्ष्मण कोळेकर यांनी ६० टन मका खरेदी करण्याची तयारी दाखवल्याने अभिषेक गर्ग याने खालसा ट्रान्सपोर्ट यांचेशी संपर्क करून अजित चौधरी यांच्याशी बोलणे करून दिले. ट्रान्सपोर्ट खर्च प्रत्येकी ४३०० रुपये टन ठरवून गाड्या बिसोरली मार्केट येथील श्री कृष्णा ट्रेडर्स येथून लोड करण्यास सांगीतले. २९ हजार ९९० किलो मका भरून काटा पावती व गाड्यांचे फोटो अमित सक्सेना व अभिषेक गर्ग यांनी कोळेकर यांना पाठवले. त्यानंतर लक्ष्मण कोळेकर यांनी १३ लाख ५ हजार १०० रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले. दरम्यान, अभिषेक गर्ग व अमित सेक्सेना यांनी सदरचे पैसे श्री कृष्णा ट्रेडर्सच्या मालकाला दिले नाहीत. त्यामुळे खालसा ट्रान्सपोर्टचे मालक अजित चौधरी यांनी ट्रक भरणा व उतरणे याचे एक लाख रुपये द्यावे लागलीत असे सांगीतल्यावर लक्ष्मण कोळेकर यांनी अजित चौधरी यांना १ लाख रुपये दिले.
त्यानंतर कोळेकर यांनी अमित सक्सेना याचे मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा फोन बंद लागला. त्यावरून ३ एस इंटर नॅशनल कंपनीचे अमित सक्सेना व अभिषेक गर्ग यांनी ६० टन मका धान्य देतो असे म्हणून १३ लाख ५ हजार १०० रुपये घेवून विश्वासात घेवून मका न पाठविता फसवणुक केल्याची लक्ष्मण कोळेकर यांची खात्री झाली. तसेच ट्रकमध्ये मका चढविणे व उतरविणे याकरीता ट्रान्सपोर्टसाठी १ लाख रुपये इतकी रक्कम घेतली आहे. याप्रकरणी लक्ष्मण मारुती कोळेकर रा. भोपसेवाडी, ता. सांगोला यांनी अमित सक्सेना रा. शिखलाप, बरेली, उत्तर प्रदेश व अभिषेक गर्ग रा. बिसोरली, मेरठ, उत्तर प्रदेश या दोघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.