विधानसभा निवडणूकीसाठी सांगोल्यात वाढली 6 मतदान केंद्रे
सांगोला – आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने सांगोला निवडणूक शाखेकडून मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत ६ ऑगस्ट रोजी १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची संख्या २९९ वरुन आता ६ ने वाढल्यामुळे एकुण ३०५ मतदान केंद्रे झाली आहेत तर नव्याने ३ हजार ३५२ मतदारांची भर पडल्याने एकूण सुमारे ३ लाख १५ हजार ८५० मतदार संख्या झाल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमात प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीत नाव असेल, तरच मतदान करता येणार आहे. यादीत नाव नसलेल्यांनी लगेच ६ नंबर फॉर्म भरून द्यावा असे आवाहन केले आहे.
येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने प्रशासनाने देखील त्या दृष्टीने तयारी केली आहे. पुर्नरीक्षण पूर्व कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण टप्प्यामध्ये ज्या मतदान केंद्रांवर १५०० पेक्षा अधिक मतदार संख्या होण्याची शक्यता होती, अशी मतदान केंद्रे विभागून नवीन मतदान केंद्रे तयार बदल केली आहेत. यापूर्वी सांगोला विधानसभा मतदारसंघात २९९ मतदान केंद्रे होती. त्यात आता लोटेवाडी, चिकमहूद, खिलारवाडी, कमलापूर, कराडवाडी, सावे या गावांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे ६ मतदान केंद्रे नव्याने वाढल्याने ३०५ मतदान केंद्रे झाली आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघात आता १ लाख ६५ हजार २४२ पुरुष मतदार तर १ लाख ५० हजार ६०३ महिला मतदार व इतर ५ मतदार तसेच १५२९ पुरुष मतदार, १८२० महिला मतदार व इतर ३ मतदार असे नव्याने ३ हजार ३५२ मतदार नोंदणी झाल्यामुळे एकूण ३ लाख १५ हजार ८५० मतदार संख्या झाली आहे.
—————————-
प्रारूपावर २० ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. १ जुलै २०२४ या दिनांकास वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये – संतोष कणसे , तहसीलदार
—————————