शेतकरी कुटुंबातील प्रियंका कारंडे हीची पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदी निवड…

सांगोला ( प्रतिनिधी) प्रियांका जगन्नाथ कारंडे रा. सोनलवाडी ता. सांगोला हिने एमपीएससी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात बाजी मारली असून शेतकरी कुटुंबातील मुलीने पहिल्याच प्रयत्नात पोलीस सब इन्स्पेक्टर पदाला गवसणी घातल्याने सोनलवाडी गावातील पहिलीच महिला अधिकारी झाली असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
प्रियांका कारंडे हीचे प्राथमिक शिक्षण सोनलवाडी , पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तिसंगी व एखतपूर,११ ते बीसीएस शिक्षण सांगोला येथील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्स मधे पूर्ण केले.२०२१ नंतर बीसीएसचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे गेली व २०२२ ला पहिल्यांदाच एमपीएससीची परीक्षा दिली त्यात तिने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा क्रॅक केली व तिची निवड पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून झाली आहे.
प्रियंका हिचे वडील जगन्नाथ कारंडे व आई हे शेतकरी असून त्यांनी शेतीत कष्ट करून मुलीचे भविष्य घडविण्यासाठी तिला पाठिंबा दिला.व तिला पुढील शिक्षणासाठी पुणे येथे अभ्यासासाठी पाठविले. तिच्या या यशात तिच्या आई-वडिलांचा फार मोठा मोलाचा हात असल्याचे तीने सांगितले. सोनलवाडी गावात पहिल्यांदाच एखादी मुलगी अधिकारी झाल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात आला व तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.