सांगोला (वार्ताहर) मातृहृदयी बापूसाहेब झपके सांगोला विद्यामंदिरच्या मुख्याध्यापकपदी असताना विद्यार्थ्यांच्या परिस्थितीच्या जाणिवेने व्याकुळ होत असत. याच भावनेतून कै. बापूसाहेबांनी 1966 साली शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना स्वपगारातून गणवेश दिले. आज जवळपास 58 वर्षे झाली ही परंपरा जोपासण्याची भूमिका शाळा व शिक्षक अतिशय चोखपणे बजावत आहेत. ही बाब अभिमानास्पद असून दातृत्व भावना निर्माण होण्यासाठी ‘गरिबीची जाण व मोठं मन’ आवश्यक आहे असे उद्गार चैतन्य हास्य क्लबचे संस्थापक, योगगुरु डी.डी. जगताप सर यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये 78 व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी आयोजित मोफत गणवेश वाटप कार्यक्रम प्रसंगी काढले.
यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, नंदकुमार राऊत, माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान, नारायण विसापूरे, बाळासाहेब वाघमारे, भागवत पैलवान गुरुजी, प्रा.राजेंद्र ठोंबरे, सुधाकर म्हेत्रे सर, अरविंद डोंबे गुरुजी, वि.मा.कोठावळे सो., सौ प्रीती घोंगडे यांच्यासह पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे, प्रा.शिवशंकर तटाळे उपस्थित होते.
माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी प्रशालेचे माजी विद्यार्थी, जेष्ठ साहित्यिक द.ता.भोसले तसेच युथ आयकॉन जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांची उदाहरणे देत त्यांनी देखील आपल्या खडतर परिस्थितीचा बाऊ न करता कठोर परिश्रमातून उच्च ध्येय प्राप्ती केली. त्याप्रमाणे आपणही अभ्यासात सातत्य ठेवत यशाची उंच भरारी घ्यावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून आपल्या भाषणातून व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रातःस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
प्रास्तविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करत सर्वांचे स्वागत केले व देणगीदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या गणवेश वाटपासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, कै.रामचंद्र म्हाकू मस्के व परिवार, सांगोला विद्यामंदिर एस.एस.सी.बॅच 1990 मित्र मंडळ, चैतन्य हास्य क्लब, सांगोला सर्व सदस्य, इंजी.मृण्मयी नंदकुमार राऊत, उद्योगपती बाबासाहेब उर्फ भारत दिघे, उद्योगपती उत्तम ढोले, माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान, नारायण विसापूरे, बाळासाहेब वाघमारे, श्रीकांत घोंगडे, अशपाक काझी, सुखानंद हळळीसागर, पद्मिनी कुलकर्णी, सुमन पाटणे, प्रदीप धुकटे, नागेश पाटील, अश्विनी साळुंखे, गिरीश पाटोळे, वसंत कपडेकर, चेतन भांडेकर, तुकाराम गेजगे, शुभांगी पलसे या देणगीदारांनी भरीव आर्थिक सहाय्य केले. यातून जवळपास 300 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी घर घर तिरंगा-हर घर तिरंगा अभियानानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक- कुमारी तहूरा तौफिक रायटर, द्वितीय क्रमांक-कुमारी अक्षरा राहुल इंगोले, तृतीय क्रमांक-कुमारी ऋतुजा दत्ता खडतरे व उत्तेजनार्थ-कुमारी प्रज्ञा शिवाजी चौगुले या यशस्वी विद्यार्थ्यांचा पेन व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार राजेंद्र ढोले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.