सांगोला:- सांगोला शहरातील राऊत मळा येथील अक्षय सावता राऊत याने यशवंत सावता राऊत रा. राऊत मळा या सख्ख्या भावाच्या निधनानंतर वाहिनी, पुतण्या व पुतणी यांची जबाबदारी लहान भावाने घेतली आहे. लहान भावाने आपल्या विधवा वाहिनी सविता सोबत लग्न केले आहे.विधवा वहिनीसोबत लग्न करुन दीराने समाजात भान जपले आहे.
मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात 25 वर्षीय भावजय आणि तिची 10 वर्षाची मुलगी व 07 वर्षाचा मुलगा दुःखात लोटले गेले. या कुटंबातील अक्षय याने मनाची हिम्मत बांधत आपल्या चिमुकल्या पुतणीचे व पुतण्याचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात समाजात विधवा महिलेला एकटीने जगणं फार कठीण असतं. मात्र अशा कठीण काळात तिला साथ देणारे अगदी क्वचितच पाहायला मिळतात. त्यातही तिच्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंग भरणारे तर शोधूनही सापडणार नाहीत. परंतु, या सर्व विचारांना फाटा दिला आहे राऊत मळा येथील एका तरुणाने. या तरुणाने आपल्या मोठ्या भाव्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच भावजयसोबत विवाह करून तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण केला आहे.
अक्षय असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या मोठ्या भावाची पत्नी सविता लग्नाचे सात फेरे घेऊन घरात आली. सर्व आनंदी आनंद सुरु असताना त्यांच्या आनंदावर विरजण पडले. काळाने झडप घातली आणि अक्षय याचा मोठा भाऊ याचा मृत्यु झाला.
या घटनेनंतर सविता हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांच्या या कठीण प्रसंगात त्यांचा लहान दीर पुढे आला. सर्व परंपरा आणि रितीभातींना दूर सारून आपल्या वहिनीशी लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला. दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह पार पडला.
दरम्यान समाजातील लोक, गावकरी, मित्र आणि पाहुणे मंडळी काय म्हणतील?, असा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह केला. त्यांच्या या कृतीने समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. राऊत मळ्यातील अक्षय याचे आई-वडील तीन बहिणी व दाजी यांचेही सहकार्य लाभले तसेच युवा कार्यकर्ते नाना राऊत विक्रम राऊत यांनीही सहकार्य केले हा विवाह होण्यासाठी मुंबई पोलीस मच्छिंद्र माळी प्राध्यापक कैलास माळी शिव सुंदर हॉटेलचे मालक वसंत माळी यांनी पुढाकार घेऊन समाजात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षय आणि सविता या दोघांना पाहुणे मंडळी, वऱ्हाडीमंडळींनी आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.