वादळी वारे पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांची भेट; तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांना सोमवारी रात्री वादळी वारे व पावसाचा फटका बसला. या वादळी वारे व पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरगरवाडी, अनकढाळ, नाझरे आदी परिसरातील नुकसानग्रस्त भागास शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

 

सांगोल्याला सोमवारी जोरदार वादळी पावसाने झोडपले. शहरात दुपारी हलका तर रात्री 8 वाजलेनंतर वादळी वार्‍यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.वादळी वारे व पावसामुळे सांगोला तालुक्यातील नाझरे, वझरे, सरगरवाडी परिसरात बागायती शेतीसह, जनावरांचे गोठे, राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव, तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

 

सांगोला तालुक्यातील सरगरवाडी येथे दि.19 ऑगस्ट रोजीच्या वादळी वारे व पावसामुळे विजेचे शॉक लागून श्री. सिकंदर नदाफ यांच्या म्हसीचा मृत्यू झाला.त्याचप्रमाणे सरगरवाडी येथे वादळी वारे व पावसामुळे श्री. विजयकुमार जाविर यांचे जनावराच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.तसेच नाझरे येथे वादळी वारे व पावसामुळे श्री.रामचंद्र आडसुळ यांचे राहत्या घरावर व टेम्पो या वाहनावर झाड पडून नुकसान झाले आहे. तसेच जनावरांची गोठे, घरांसह डाळिंब, पेरु, मका पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

झालेल्या नुकसानाची कल्पना संबंधीत गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना संपर्क करुन दिली होती. तर शेकाप कार्यकर्त्यांनी काही ठिकाणच्या शेतकर्‍यांना डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधून देत त्यांच्याही भावना सांगितल्या होत्या.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागास भेटी देवून या संदर्भात शेतकर्‍यांना पूर्णत: मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button