सांगोला(प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे 8 ते 10 महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले. 10 महिन्यांत महाराजांचा पुतळा कोसळला हे दुर्दैवी आहे. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही कदापीही सहन करणार नसून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली.
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ढासळला. शिवछत्रपतींनी समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग वादळ वार्यांना आणि लाटांच्या तडाख्याना तोंड देत साडेतीनशे वर्ष झाली तरी भक्कमपणे उभे आहेत. आणि अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच उभारलेला खुद्द छत्रपतींचाच पुतळा ढासळावा, ही सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची गोष्ट असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे.
शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण 2023 मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे उदाहरण असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.